रत्नागिरी : राज्यभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असताना कोकणातील बळीराजाची दिवाळी मात्र शेतातच साजरी होत आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे भात कापणी आणि झोडणीच्या कामांचे गणित बिघडले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीतही शेतकऱ्यांना शेतात राबावे लागत आहे.

भाताची झोडणी करून पीक घरी नेण्याची लगबग सुरू असल्याने शेतकऱ्यांची दिवाळीची तयारीही शेतातच सुरू आहे. सकाळी सात वाजल्यापासून शेतात काम करणारा शेतकरी संध्याकाळी उशिरा शेतीची कामे आटोपून घरी परतत आहे. शेतातच दिवाळीचे फराळाचे पदार्थ खाऊन सणाचा आनंद घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कोकणातील सुमारे ७० टक्के शेतकरी सध्या भात झोडणी आणि मळणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे.