
देवरुख : सण-उत्सव हे केवळ आनंद साजरा करण्याचे निमित्त नसते, तर माणसांमधील नात्यांची वीण अधिक घट्ट करण्याची संधी असते. याच भावनेतून कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांनी दरवर्षीची आपुलकीची परंपरा यंदाही कायम राखत दीपावली व लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय पर्वानिमित्त देवरुख शहरातील व्यापारी बांधवांची सदिच्छा भेट घेतली. मोठ्या व्यापाऱ्यांपासून छोट्या व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकाच्या दुकानात जाऊन त्यांनी मनमोकळा संवाद साधत सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आमदार शेखर निकम यांची ही भेट केवळ औपचारिक शुभेच्छांपुरती मर्यादित नव्हती, तर व्यापारी वर्गाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची प्रचिती देणारी ठरली. यावेळी त्यांनी मोठ्या व्यापाऱ्यांसह लहान दुकानदारांच्या* व्यवसायाची आस्थेने विचारपूस* केली. नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुण उद्योजकांच्या दुकानांची माहिती घेत त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. दुकानांमधील आकर्षक वस्तू, नवनवीन उत्पादने यांची प्रशंसा करत व्यावसायिकांना प्रोत्साहन दिले. हॉटेल व्यावसायिकांच्या भेटीदरम्यान तेथील रुचकर पदार्थांचेही त्यांनी आवर्जून कौतुक केले.
व्यापार हा शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो. व्यापाऱ्यांच्या मेहनतीवर बाजारपेठेची आणि पर्यायाने शहराच्या आर्थिक विकासाची घडी अवलंबून असते. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि व्यवसायातील बदल समजून घेण्याची आमदार निकम यांची ही भूमिका विशेष महत्त्वाची ठरते. प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालण्याची त्यांची कार्यपद्धती या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
आमदार शेखर निकम यांची ओळख केवळ राजकीय नेतृत्व म्हणून नसून विकासकामांचा ध्यास घेऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी जोडलेले लोकप्रतिनिधी म्हणून आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण भागातील मूलभूत सोयीसुविधांसारख्या महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. विकासकामांसोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि स्थानिक प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घेत जनतेशी सातत्याने संवाद ठेवण्यावर त्यांचा भर आहे.
राजकारणात पदापेक्षा माणुसकी आणि जनतेशी असलेली नाळ महत्त्वाची असते, याची जाणीव करून देणारी त्यांची ही दिवाळी सदिच्छा भेट ठरली. व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन त्यांच्या व्यवसायाचे कौतुक करणे, नव्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे आणि प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधणे, यातून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जनसंपर्काची शैली दिसून आली.
यावेळी व्यापारी वर्ग, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, विविध पक्षीय सेलचे पदाधिकारी, युवक-युवती पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळीच्या प्रकाशात केवळ शुभेच्छांचा वर्षाव नव्हे, तर विश्वास, आपुलकी आणि विकासाच्या नात्याला नवी उजाळणी देणारी आमदार शेखर निकम यांची ही व्यापारी सदिच्छा भेट देवरुखच्या व्यापारी वर्तुळात विशेष कौतुक करणारी ठरली.