दापोलीः- धर्म वेगळे असले तरी, माणुसकीचा धर्म एकच असतो, याची प्रचिती दापोली तालुक्यातील हर्णे येथे आली. माजी सरपंच व मत्स्य व्यावसायिक अस्लम अकबानी यांनी दिवाळीत गरीब आदिवासी कातकरी कुटुंबाना आनंदाचा शिधा भेट देत त्यांच्या सणाचा आनंद व्दिगुणित करतानाच सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला.
दिवाळी म्हणजे घराघरांत पणत्या उजळतात, फराळाचा सुगंध दरवळतो. आकाशकंदिल लखलखतात आणि चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो. मात्र समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी सणाचा हा आनंद अनेकदा परिस्थितीच्या मर्यादेत अडकून राहतो. रोजच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणाऱ्या आदिवासी कातकरी कुटुंबाना सणासुदीच्या काळातही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कुटुंबाच्या आयुष्यातही दिवाळीचा प्रकाश पोहोचावा, त्यांच्या घरात सणाचा गोडवा निर्माण व्हावा आणि मुलांच्या चेहNयावर समाधानाचे हास्य फुलावे, या संवेदनशील भावनेतून असलम अकबानी यांनी हा उपक्रम राबविला.
अस्लम अकबानी यांचा हा उपक्रम केवळ वस्तूंचे वाटप करण्यापुरता मर्यादित नाही, तर समाजातील वंचित घटकांप्रती असलेली आस्था व माणुसकीची जाणीव व्यक्त करणारा प्रयत्न ठरला आहे. धर्म, जात, पंथ या पलिकडे जाऊन माणसाशी माणसाने माणुसकीचे नाते जपले पाहिजे, हा विचार त्यांच्या कृतीतून अधोरेखित झाला. विशेष म्हणजे अकबानी दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने हा उपक्रम राबवत आहेत.