लांजा : येथील ‘ईठ्ठला’ नाटकावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करत वारकरी संघटना, लांजा व हिंदू जनजागृती समिती, रत्नागिरी जिल्हा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे निवेदन दिले. मनुजजी जिंदल यांना तसेच पुढील निवेदने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक मंत्री अधिवक्ता आशिष शेलार, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांना देण्यात आली.
यानंतर पालकमंत्री उदय सामंत व हिंदू जनजागृती समितीचे श्री. घनवट यांच्यात या नाटकाबाबत चर्चा झाली. पालकमंत्र्यांनी सदर नाटक तुम्हाला पुन्हा सादर करता येणार नाही, अशी समज नाटक समितीला दिली. त्यानंतर नाटक समिती आमदार किरण सामंत यांना भेटली. त्यांनीही नाटक समितीला सांगितले की, “मी देव, संत आणि वारकरी यांच्या विरोधात जाणार नाही. तुम्ही नाटक पुन्हा सादर करू नये,” अशी ठाम भूमिका घेतली.
वरील मंत्र्यांकडून चौकशीचे काम सुरू असतानाही, मंत्र्यांचा आदेश धुडकावून सदर नाटक पुन्हा सादर करण्यात येणार असल्याचे नाटक समितीकडून सांगण्यात येत आहे.
‘ईठ्ठला’ हे नाटक चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहे. त्यामध्ये विठ्ठलाचा ‘ईठ्ठल’, तुकारामांचा ‘तुका’, नामदेवांचा ‘नाम्या’ असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच संतांची नावे वेशभूषेसह चुकीच्या प्रकारे सादर केली आहेत. पंढरीचे वारकरी पंढरपूरला जात असताना मुक्कामासाठी संतांच्या घरी येतात. त्यांना खोली दिली जाते. ते खोलीत आपले सामान ठेवून विश्रांती घेत असताना, बाहेर संत मंडळी भजनात तल्लीन असतात. त्यावेळी ‘तुका’ त्या वारकऱ्यांच्या खोलीत जाऊन त्यांचा खून करतो. त्यानंतर त्याचे प्रेत पोत्यात भरून बाहेर आणले जाते व त्याच्याकडील धनदौलत, पैसा व दागिने काढून घेतले जातात. पुढे ते कुठे ठेवायचे, असा प्रश्न उपस्थित केला जातो आणि ते ‘ईठ्ठलाच्या’ पायाखाली ठेवण्याचे ठरते. यामुळे देवाला आरोपी ठरवले जात असल्याचे दिसून येते.
यानंतर जनाचा मुलगा बाहेरगावी जातो आणि अनेक वर्षांनी घरी परततो. त्याला ओळखले जात नाही. वारकरी समजून त्यालाही खोली दिली जाते. बाहेर भजनी मंडळींचे भजन सुरू असताना, जना खोलीत जाऊन त्या मुलाचाही खून करते. त्यानंतर त्याचेही प्रेत पोत्यात भरून बाहेर नेल्याचे दाखवले जाते. पुढे जनाला कळते की, आपल्या मुलाचाच खून आपल्या हातून झाला आहे, याची तिला खंत वाटते. असे एकूण दहा खून केल्याचे ते स्वतः कबूल करतात, पण कोणालाही ते सापडत नाहीत. असे या ‘ईठ्ठला’ नाटकात दाखवले जाते.
आजपर्यंत कोणत्याही पुराणात असे काहीही वाचण्यात आलेले नाही. साधू-संतांनी कधीही कोणाचा खून केलेला नाही किंवा त्याबाबत उल्लेखही नाही. महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत आपला क्रमांक यावा, हाच या नाटकाचा उद्देश असल्याचे दिसते. या नाटकाचा उदोउदो कोणी करत नाही; फक्त नाटक समितीच त्याचे कौतुक करत आहे. हे नाटक वारकरी, भाविक, भक्त, धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रातील कोणालाही आवडलेले नाही.
याबाबत मंत्री महोदयांनी नाटकावर बंदी घातली आहे. मात्र, नाटक समितीने ती धुडकावून लावली असून मराठी चित्रपट असोसिएशन या संस्थेने परवानगी दिली आहे. त्यामुळे त्या संस्थेचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वारकरी व हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.