चिपळूण : सध्या चिपळूण मधील काही नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते सतत नगरपालिकेकडे भटक्या कुत्र्यांची तक्रार करत आहेत परंतु सदर नागरिकांना वास्तव परिस्थितीचे ज्ञान नसल्याने तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे, प्राणीप्रेमींना जशी प्राण्यांच्या जीवाची काळजी आहे तसेच माणसाच्या जीवाचीही काळजी आहे, परंतु स्वतःच्या राजकारणासाठी फक्त भटक्या कुत्र्यांचा विषय उचलून धरणे हे कितपत योग्य आहे? चिपळूण शहरात नागरिकांच्या जीवाला जास्त धोका येथील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचा आहे, सदर समस्या कोणालाही दिसत नाही आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा म्हणजे नक्की काय करायचे अशी अपेक्षा सदर सामाजिक कार्यकर्त्यांची आहे असा प्रश्न नगरपालिके समोर उभा राहिला आहे, सदर समस्येवर उपाययोजना म्हणून माननीय नगराध्यक्ष यांनी कुत्र्यांच्या गळ्यात पट्टा आणि काठी घालण्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे.
तर ही एक प्रकारची क्रूरता आहे, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६० नुसार प्राण्यांना अमानुष वागणूक देणे हा कायद्याने गुन्हा आहे, तसेच सदर कायद्याचे उल्लंघन केल्यास दंड किंवा कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. भारतीय संविधानाच्या कलम ५१(ए)(जी) नुसार प्राण्यांचे रक्षण करणे हे नागरिकांचे कर्तव्य मानले जाते. तेव्हा भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात पट्टा आणि काठी घालण्याचे प्रकार आढळून आल्यास पुढील कायदेशीर कारवाईस संबंधित अधिकारी आणि नगरपालिका स्वतः जबाबदार राहील असा इशारा प्राणीप्रेमी हर्षद पवार यांनी दिला आहे.
तसेच भटक्या श्वानांच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुत्र्यांचे निर्बिजीकरण, रेबीज लसीकरण हा एकमेव पर्याय आहे आणि जनजागृती करण्यासाठी प्राणीप्रेमींनी मागील महिन्यात बॅनर बनवण्याचे सुचविले होते परंतु त्यावरही नगरपालिकेने दुर्लक्ष केले असेही हर्षद पवार यांनी सांगितले आहे.