मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘स्वर्गीय इंदिरा गांधी’ यांची जयंती ‘राष्ट्रीय एकात्मता दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर होते. यावेळी डॉ. शैलेश भैसारे, ग्रंथपाल डॉ.दगडू जगताप, बाबासाहेब पाटील, सचिन थोरे, दत्ता भारदे, विजय शिंदे, सोनाली मर्चंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभारी प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर यांचे हस्ते माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. शैलेश भैसारे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. यानंतर श्री. बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित सर्वांना ‘राष्ट्रीय एकात्मता दिना’बाबत शपथ दिली.
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर म्हणाले की, लहानपणापासूनच इंदिराजींना आपल्या घरातूनच स्वातंत्र्यलढ्याचे आणि देशसेवेचे बाळकडू मिळाले होते. इंदिरा गांधी यांचे संपूर्ण जीवन हे धैर्य, आत्मविश्वास आणि देशभक्तीचे प्रतीक असून त्या निर्णायकपणा आणि दृढनिश्चयासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या राजकीय कार्यामुळे त्यांना ‘आर्यन लेडी’ म्हणूनही ओळखले जाते. देशची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाला समर्पित कले असे सांगितले.
कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ.दगडू जगताप यांनी मानले.
मुंडे महाविद्यालयात ‘राष्ट्रीय एकात्मता दिन’ उत्साहात साजरा…
