मुंबई : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत (NBT-India) यांच्या वतीने २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुंबई पुस्तक महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील प्रवेशद्वार क्रमांक २ जवळ हा सहा दिवसीय महोत्सव पार पडणार आहे. महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव पुस्तके, ज्ञान आणि भारताच्या समृद्ध बहुभाषिक साहित्यिक परंपरेचा उत्सव ठरणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
या महोत्सवाची घोषणा आयोजनस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. या पत्रकार परिषदेच्या अध्यक्षस्थानी मुख्य आयोजक अमित साटम होते. यावेळी महोत्सवाचे मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी, राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारतचे संचालक युवराज मलिक तसेच मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे उपस्थित होते.
या महोत्सवात २०० प्रकाशकांचे ६०० हून अधिक पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात येणार असून, विविध भाषा आणि साहित्यप्रकारांतील पुस्तकांचा मोठा संग्रह वाचकांना अनुभवता येणार आहे. सहा दिवसांच्या या महोत्सवात १०० हून अधिक विविध कार्यक्रम आणि सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये साहित्यिक संवाद, लेखकांशी थेट संवाद, पुस्तक प्रकाशन सोहळे, विषयाधारित प्रदर्शने, बालकांसाठी विशेष उपक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल. सर्व वयोगटांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि समाजात पुस्तक संस्कृती अधिक बळकट करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
या महोत्सवात दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजीत सिंह संधू, आचार्य प्रशांत, पॅरालिम्पिक खेळाडू दीपा मलिक, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, गीतकार मनोज मुंतशिर, चित्रपट दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी, अभिनेत्री व लेखिका शेफाली शाह, अंतराळवीर शुभांशू शुक्ला, अरुणा ढेरे, शशिकांत सावंत, मयूर शाह, राजीव श्रीखंडे, साहित्यिक विश्वास पाटील, शरणकुमार लिंबाळे, अश्विन सांघी, आनंद नीलकंठन, अक्षत गुप्ता, मेधा भास्करन, अंजुम चोप्रा, अंशुल चतुर्वेदी, एहसान वजीर, निकिता ठाकूर आणि प्रफुल्ल बिल्लौरे यांच्यासह अनेक मान्यवर वक्ते सहभागी होणार आहेत.
महोत्सवाचे मुख्य आयोजक अमित साटम यांनी सांगितले की, या महोत्सवात २०० प्रकाशकांचे ६०० हून अधिक पुस्तकांचे स्टॉल असतील. यासोबतच ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या १५० वर्षांच्या गौरवशाली प्रवासावर तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विशेष प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महोत्सवाचे मुख्य संयोजक, मुंबई भाजपचे महामंत्री, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आणि लेखक आचार्य पवन त्रिपाठी यांनी सांगितले की, दररोज आयोजित करण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रम, लेखक मंच आणि बालकांसाठीचे विशेष उपक्रम हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहेत. दररोज सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत बालकांसाठी विविध उपक्रम, दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत लेखक मंच आणि सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
मुंबईत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजित होणाऱ्या या पुस्तक महोत्सवात पुस्तकप्रेमी, साहित्यिक, लेखक, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच मुंबईतील वाचन आणि पुस्तक संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
महोत्सवासंदर्भातील अधिक माहितीसाठी www.mumbaibookfestival.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल. मुंबईच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा देणारा हा महोत्सव ठरणार आहे. महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
