दापोली : राज्यभरातील निधीअभावी १०८ महाडायलिसिस केंद्रांच्या सेवा बंद ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर आज उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथील HLL कंपनीमार्फत चालविण्यात येणारे महाडायलिसिस केंद्रही अचानक बंद करण्यात आले होते. या केंद्रामार्फत दापोली व परिसरातील सुमारे ३२ रुग्ण नियमितपणे मोफत डायलिसिस सेवेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे केंद्र बंद झाल्याने नियमित डायलिसिसवर अवलंबून असलेल्या रुग्णांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालय, दापोली प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था केली. आज डायलिसिस आवश्यक असलेल्या ६ रुग्णांना जवळच्या खासगी डायलिसिस केंद्रांमध्ये स्थलांतरित करून महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत (MJPJAY) मोफत डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच या रुग्णांच्या वाहतुकीची जबाबदारी उपजिल्हा रुग्णालय, दापोलीमार्फत १०२ रुग्णवाहिकेच्या साहाय्याने पार पाडण्यात आली. त्यामुळे केंद्र बंद असतानाही रुग्णांचे आवश्यक उपचार खंडित होऊ नयेत यासाठी रुग्णालय प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली.

दरम्यान, या गंभीर प्रश्नाची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री श्री. योगेशदादा कदम साहेब यांनी तातडीने हस्तक्षेप करून महाडायलिसिस केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. त्यांच्या या सकारात्मक आणि तत्पर हस्तक्षेपामुळे उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथील महाडायलिसिस केंद्र आज सायंकाळपासून पुन्हा कार्यान्वित होणार आहे.

या निर्णयामुळे डायलिसिसवर अवलंबून असलेल्या सुमारे ३२ रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांची नियमित उपचारसेवा पूर्ववत होण्यास मदत होणार आहे.

संकटाच्या काळात रुग्णालय प्रशासनाने दाखवलेली तत्परता, पर्यायी उपचारांची केलेली व्यवस्था आणि माननीय मंत्री श्री. योगेशदादा कदम साहेब यांनी केलेला वेळेवर हस्तक्षेप यामुळे रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देत डायलिसिस सेवा त्याच दिवशी पूर्ववत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.