दापोली: वीज मीटर संदर्भातील विविध समस्या आणि ग्राहकांच्या तक्रारींवरून दापोलीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. कार्यकर्त्यांनी थेट दापोली येथील महावितरण कार्यालयात धडक देत संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
दापोली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वीज मीटरच्या संदर्भात अनेक तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. वीज ग्राहकांना होत असलेल्या त्रासाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
यावेळी कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वीज मीटर संदर्भातील प्रलंबित प्रश्न आणि ग्राहकांच्या अडचणी तातडीने मार्गी लावाव्यात, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून महावितरण प्रशासनाला देण्यात आला आहे. या आंदोलनात उबाठा शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वीज मीटरच्या प्रश्नावरून दापोलीत शिवसेना (उबाठा) आक्रमक; महावितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर…
