पुणे : पुण्यात लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची मिरवणूक २६ तासांनंतरही सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता सुरू झालेल्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड आणि केळकर रोडवरून अद्याप सुरू आहेत. ढोल-ताशांच्या गजरात गणेश मंडळे विसर्जन घाटाकडे रवाना होत आहेत. सुमारे २०० मंडळे विसर्जन घाटाकडे रवाना झाली असून ३०० हून अधिक गणपतींचे विसर्जन अद्याप बाकी असल्याची माहिती आहे. भर उन्हातही मिरवणुका पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गतवर्षी विसर्जन मिरवणुकीला ३६ तासांहून अधिक वेळ लागला होता. यंदा मिरवणूक पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
२६ तासांनंतरही पुण्यात विसर्जन मिरवणुका सुरूच; भर उन्हात बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकर रस्त्यावर..
