मुंबई : भाजपचे राष्ट्रीय संयुक्त महासचिव (संघटन) शिवप्रकाश यांनी चर्चात्मक संवाद करताना सांगितले की, विकसित भारताचे स्वप्न केवळ आर्थिक विकास आणि मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून पूर्ण होणार नाही. त्यासाठी आर्थिक संपन्नता, देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा, सामाजिक समरसता तसेच पर्यावरणाचे संरक्षण आवश्यक आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवात राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे (नॅशनल बुक ट्रस्ट) संचालक युवराज मलिक यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, युवा शक्तीच देशाचे भविष्य निश्चित करेल आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी चारित्र्यसंपन्न कार्यकर्त्यांची निर्मिती आवश्यक आहे.
पुस्तक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी लहान मुले आणि तरुणांमध्ये पुस्तकांविषयीची आवड दिसून आली. चित्रपती व्ही. शांताराम यांच्याविषयी प्रा. कादरी साजिद आणि डॉ. अजमत अन्वर दलाल यांनी आपले विचार मांडले. ‘थिरुक्कुरल विदाउट फ्रंटियर्स’ या विषयावर डॉ. रामनाथन श्रीनिवासन आणि पी. श्रीगणेश यांनी चर्चा केली.
‘शांती के लिए पुकार’ या पुस्तकाचे विमोचन पृथ्वीराज तौर, सुनील बाबूराव कुलकर्णी, डॉ. करुणाशंकर उपाध्याय आणि डॉ. रामदास तोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘अत्ता दीप भवः एक प्रवास’ या पुस्तकाचेही विमोचन झाले. ‘छत्रपती शिवाजी महाराज : द लायन ऑफ द डेक्कन’ या विषयावर अर्चना गारोडिया गुप्ता यांनी आपले विचार मांडले.
‘५१ मॉन्युमेंट्स ऑफ इंडिया’ या विषयावर संजीव ब्रह्मे आणि अमेय रानडे यांनी चर्चा केली. ‘एडिटर्स डायलॉग’मध्ये पराग करंदीकर, अतुल कुलकर्णी आणि मीनल बघेल सहभागी झाले होते. यावेळी डॉ. दीपक करंजीकर आणि अमेय रानडे यांनी नाट्य आणि साहित्याविषयी देखील आपले विचार व्यक्त केले. तपस्या नेवे यांनी शरणकुमार लिंबाळे यांच्याशी संवाद साधला. तर आशीष चौहाण यांनी ‘स्थितप्रज्ञ : समत्वाच्या दिशेने प्रयाण’ या विषयावर आपले विचार मांडले.
संध्याकाळच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमात प्रसिद्ध ‘थाइक्कुडम ब्रीज’ या बँडने आपले सादरीकरण करून युवा वर्गाला उत्साहित केले.