चिपळूण : दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले हे चिपळूण दौऱ्यावर आले असता त्यांनी आज सह्याद्रि शिक्षण संस्थेस सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेचा ऐतिहासिक वारसा, संस्थापक स्व. गोविंदरावजी निकम साहेब यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
या भेटीदरम्यान आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक, माजी खासदार स्व. गोविंदरावजी निकम साहेब यांच्या स्मारकस्थळी जाऊन त्यांना विनम्र अभिवादन केले.
त्यानंतर त्यांनी ‘स्मृतिगंध’ संग्रहालयाला भेट देऊन तेथील दुर्मिळ छायाचित्रे, ऐतिहासिक दस्तऐवज आणि स्व. गोविंदरावजी निकम साहेब यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणाऱ्या छायाचित्रांचे बारकाईने अवलोकन केले.
संस्थेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आणि विविध क्षेत्रांतील योगदानाचा परिचय त्यांनी यावेळी जाणून घेतला. तसेच स्मृतिगंध परिसरातील स्व. अजितदादांच्या , स्व. आर आर पाटिल स्मृतींशी जोडलेल्या वृक्षाजवळ काही काळ थांबून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
संग्रहालयाच्या पाहणीनंतर सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या वतीने आमदार डॉ. भोसले यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजाताई निकम यांनी त्यांचे स्वागत केले, तर संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांनी शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव केला.
या प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशसरचिटणीस जयंद्रथ खताते, भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, दशरथ दाभोळकर, दिशा दाभोळकर, अभिजित खताते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी, सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या विविध शाखांचे प्राचार्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेस दिलेल्या या सदिच्छा भेटीबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
