चिपळूण :कोयना जलविद्युत प्रकल्पातून पाणी मुंबईला वळविण्याच्या चर्चेमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी सभापती तथा पर्यावरणप्रेमी शौकतभाई मुकादम यांनी आक्रमक भूमिका घेत या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे.कोयना धरणातील पाण्याचे वळविणे आणि त्याचा नदीप्रवाहावर होणारा परिणाम यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणी उपलब्धतेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. वाशिष्ठी नदीवर चिपळूण शहरासह अनेक गावांच्या जॅकवेल, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, शेती आणि औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत. त्यामुळे भविष्यात चिपळूणसह कोकणातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ शकते.

चिपळूण रेल्वे स्थानकावर बाहेरच्या राज्यांतून येणाऱ्या गाड्याही पाणी भरण्यासाठी थांबतात. त्यामुळे रेल्वेच्या पाणीपुरवठ्याचाही विचार होणे आवश्यक आहे.मुकादम म्हणाले की, मुंबईच्या समुद्रकिनारी समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून गोडे पाणी निर्माण करणारे प्रकल्प उभारा. आखाती देशांमध्ये कमी पाऊस असूनही समुद्रजल शुद्धीकरणाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाते. मग मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर असे प्रकल्प का सुरू करू नयेत?कोयनेचे पाणी वळविण्यापूर्वी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पाण्याच्या हक्कांचा, वाशिष्ठी नदीच्या पाणी उपलब्धतेचा, स्थानिक जॅकवेल, शेती आणि गावांच्या पाणीपुरवठ्याचा सखोल अभ्यास करावा.मुंबईची तहान भागविण्यासाठी कोकणचा घसा कोरडा करू नका! कोकणचे पाणी कोकणच्या जनतेसाठीच राखले गेले पाहिजे. स्थानिक जनतेच्या पाण्याच्या हक्कावर गदा आणणाऱ्या निर्णयाला लोकशाही मार्गाने विरोध करू, असा इशारा शौकतभाई मुकादम यांनी दिला आहे.१. चिपळूण शहराच्या आणि तालुक्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था झाली आहे का?२. वाशिष्ठी नदीवर अवलंबून असलेल्या जॅकवेल आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य काय?३. नदीचे पाणी मुंबईला वळविल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?४. नदीकाठच्या शेतीला आणि शेतकऱ्यांना आवश्यक असलेले पाणी कसे उपलब्ध होणार?५. चिपळूणच्या औद्योगिक वसाहतींना भविष्यात पाणीपुरवठा कसा केला जाणार?
६. प्रस्तावित पाणी वळविण्याच्या योजनेचा पर्यावरणीय अभ्यास, जलउपलब्धता आणि स्थानिक नागरिकांची मते विचारात घेतली आहेत का?७. चिपळूण-कराड रेल्वेमार्गाचे भूमिपूजन होऊनही काम अद्याप रखडलेले असताना स्थानिक विकासाच्या प्रश्नांपेक्षा पाणी मुंबईला नेण्याची चर्चा कशासाठी?