मोहपाडा : अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या स्वर्णाली सौरभ सकपाळ हिने खासदार क्रीडा संग्राम सीझन २ मध्ये लाठी-काठी (मर्दानी खेळ) या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे परिसरात तिचे कौतुक होत आहे.
डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित खासदार क्रीडा संग्राम सीझन २ या स्पर्धेत स्वर्णालीने लाठी-काठीच्या सादरीकरणातून उत्कृष्ट कौशल्य दाखवत प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या या कामगिरीबद्दल तिला विजेतेपदाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्वर्णाली ही न्यू इंग्लिश इंटरनॅशनल स्कूल, मोहपाडा येथे ज्युनिअर केजीमध्ये शिक्षण घेत असून, गर्गी सोशल अकॅडमी येथे लाठी-काठी या पारंपरिक मर्दानी खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षक श्री. संतोष दशरथ चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली ती गेल्या चार महिन्यांपासून सराव करत आहे.
यापूर्वीही स्वर्णालीने भेंडिपाडा येथील चिंतामणी आगमन सोहळा, बदलापूर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन, बदलापूर पूर्व येथील आषाढी वारी विशेष कार्यक्रम तसेच लालबाग-परेल येथील गणेशोत्सव कार्यक्रमांमध्ये लाठी-काठीचे प्रात्यक्षिक सादर केले आहे.
इतक्या लहान वयात पारंपरिक मर्दानी खेळात मिळवलेले हे यश तिच्या मेहनतीचे, सरावाचे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित आहे. स्वर्णालीच्या या यशामागे तिच्या आई-वडिलांचे आणि कुटुंबीयांचे प्रोत्साहन व सहकार्यही मोलाचे ठरले आहे.
स्वर्णालीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे प्रशिक्षक, शाळा, कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन होत असून, भविष्यातही तिने अशीच यशाची नवनवीन शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.