लोटे : प्रसूती सेविका संस्था (Society of Midwives India) व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या एम.ई.एस. कॉलेज ऑफ नर्सिंग, लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक प्रसूतीला प्राधान्य देण्यासाठी देशव्यापी जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत घाणेखुंटचे सरपंच श्री. संतोष ठसाळे, महिला बचत गट, झाशीची राणी ग्राम संघ, रोट्रॅक्ट क्लब ,रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लब, लोटे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या पदयात्रेत एम.ई.एस. कॉलेज ऑफ नर्सिंगचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मिळून एकूण १६२ जण सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी नैसर्गिक प्रसूतीचे महत्त्व आणि फायदे अधोरेखित करणारे आकर्षक जनजागृतीपर बॅनर तयार केले होते. नैसर्गिक प्रसूतीचे महत्त्व सांगणाऱ्या प्रभावी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या माध्यमातून गर्भवती महिला आणि समाजामध्ये नैसर्गिक प्रसूतीविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
पदयात्रेनंतर आयोजित जनजागृती कार्यक्रमात श्रावणी सुर्वे, प्रणाली रेडीज, सुनीता गांधी, शामल खताते, संतोष ठसाळे, स्नेहल पाचुपते आणि प्रा. शिवप्रसाद हलेमनी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नैसर्गिक प्रसूतीचे महत्त्व, आई व बाळाच्या आरोग्यासाठी त्याचे फायदे तसेच प्रसूतीविषयी असलेले गैरसमज दूर करण्याची आवश्यकता याविषयी त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना गोखले यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन एम.ई.एस. कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य प्रा. मिलिंद काळे आणि प्रा. दिव्या के. एम. यांनी केले. विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट, विद्यार्थी आणि नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे ही जनजागृती पदयात्रा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी झाली.
“नैसर्गिक प्रसूतीला प्राधान्य, माता आणि बालकाच्या आरोग्याचे संवर्धन” हा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.