रत्नागिरी :- पश्चिम किनारपट्टीच्या सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने तटरक्षक क्षेत्र (पश्चिम) अंतर्गत रत्नागिरी येथे स्वदेशी बनावटीचे अत्याधुनिक प्रगत हलके हेलिकॉप्टर (अॅडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टर – एएलएच एमके-३) ‘तटरक्षक ८७५’ अधिकृतपणे ताफ्यात दाखल केले आहे. १३ ऑक्टोबर रोजी कोस्ट गार्ड एअर स्टेशन (आयसीजीएएस) रत्नागिरी येथे दाखल झालेल्या या विमानाचे पारंपरिक ‘वॉटर कॅनन सॅल्युट’ देऊन अत्यंत दिमाखात स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय तटरक्षक वायू अवस्थान रत्नागिरीच्या कमांडिंग ऑफिसरनी विमान आणि उपस्थित क्रू सदस्यांचे स्वागत करत मोहिमेचा शुभारंभ केला.
रत्नागिरीतील ८३१ स्क्वॉड्रन (तटरक्षक) मध्ये तैनात केल्या जाणाऱ्या प्रस्तावित पाच एएलएच एमके-३ विमानांपैकी हे पहिले विमान असून, यामुळे या संपूर्ण स्क्वॉड्रनच्या कार्यक्षमतेत नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. अत्याधुनिक रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिकल पॉड आणि ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीमने सुसज्ज असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये दूर अंतरावरून अचूक इमेजिंग आणि संशयित हालचाली ओळखण्याची प्रचंड क्षमता आहे. याखेरीज शत्रूच्या लक्ष्याला हवेतच निष्प्रभ करण्यासाठी विमानातील केबिनमध्ये १२.७ मिमी क्षमतेची हेवी मशीन गन बसवण्यात आली आहे. या प्रगत यंत्रणेमुळे विशेषतः महाराष्ट्राच्या अतिसंवेदनशील सागरी हद्दीत आणि देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्रात (ईईझेड) सागरी हितसंबंधांचे रक्षण करताना सतत पाळत ठेवणे, जलद शोधमोहीम आणि आणीबाणीच्या प्रसंगी तातडीने प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.
केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या महत्त्वाकांक्षी दृष्टीकोनानुसार संरक्षण दलांच्या उड्डाण क्षेत्रात स्वावलंबन वाढवण्यासाठी उचललेले हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. मेसर्स एचएएल सोबत झालेल्या नवीन करारातील एकूण नऊ विमानांपैकी भारतीय तटरक्षक दलात दाखल होणारे ‘सीजी ८७५’ हे पाचवे विमान ठरले आहे. या शक्तिशाली रोटरी-विंग विमानांच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या समावेशामुळे धोरणात्मक व भौगोलिक आव्हानांचा सामना करणाऱ्या पश्चिम सागरी क्षेत्रात सागरी पाळत, शोध व बचाव कार्य, प्रदूषण नियंत्रण आणि इतर आव्हानात्मक मोहिमा अत्यंत प्रभावीपणे राबविणे तटरक्षक दलाला सुलभ होणार आहे.
