रायगड: स्वरीत कला मंच संस्था, पेण यांच्या वतीने आयोजित ‘सुर सम्राट २०२६ – रायझिंग स्टार्स ऑफ रायगड’ या गायन स्पर्धेचा ग्रँड फिनाले अलिबाग येथे उत्साहपूर्ण आणि संगीतमय वातावरणात संपन्न झाला. या स्पर्धेत तरुण गायकांसह ज्येष्ठ नागरिकांनीही आपल्या गायनकलेचे सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

या स्पर्धेची प्रथम फेरी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी अलिबाग येथील सिंगिंग स्टार्स कराओके स्टुडिओ येथे पार पडली. या फेरीत ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ३२ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. प्रथम आणि द्वितीय अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. अंतिम फेरीचा कार्यक्रम दि. (21)रोजी अलिबाग बायपास रोड येथील न्यू सन्मान हॉटेलमध्ये दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत पार पडला.

कार्यक्रमाला अभिनेत्री जयश्री गायकवाड, प्रसिद्ध संमोहनतज्ज्ञ डॉ. महेश काटे, एएनआय(ANI), दैनिक रायगड टाइम्सचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्र परिवर्तनवादी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष धम्मशील सावंत, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, विक्रांत वार्डे, संगीतकार योगेश काळबेरे, योगेश कुमार, सिंगिंग स्टार्स कराओके स्टुडिओचे बोराडे दाम्पत्य, पानसरे सर, साठे सर, पेणचे माजी नगरसेवक जनार्दन जाधव, युवा कवी-लेखक व संगीतकार प्रतीक वाघमारे तसेच सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांचे चिरंजीव मुकुल खेबुडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धकांनी सादर केलेल्या विविध लोकप्रिय गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. तरुण गायकांसोबत ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या गायनकौशल्याची छाप पाडली. ग्रँड फिनालेचे परीक्षण मुंबईचे विनीत जोशी यांनी, तर प्रथम फेरीचे परीक्षण मुंबईचे यशवंत कुलकर्णी यांनी केले.

या सोहळ्यात उत्कृष्ट संपादक व निर्भीड पत्रकार म्हणून धम्मशील सावंत यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. महेश काटे यांना ‘आरोग्य रत्न’, प्रतीक वाघमारे यांना ‘संगीत रत्न’, तर सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना ‘समाज रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेत्री जयश्री गायकवाड आणि मुकुल खेबुडकर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

स्पर्धेच्या गट क्रमांक एकमध्ये शिवदास पांडुरंग नाखवा यांनी प्रथम, विशाल चव्हाण यांनी द्वितीय, तर जय जयवंत वारे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. प्रमोद नामदेव झाल्टे आणि सायली समीर काठे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. ज्येष्ठ नागरिकांच्या गटात जगदीश रामचंद्र राऊत यांनी प्रथम, राजेंद्र गंगाधर पाटील यांनी द्वितीय, तर महेश राजाराम पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळवला. अरविंद वासुदेव गोसावी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष अरविंद वाघमारे, सचिव राजेंद्र पाटील, खजिनदार अपर्णा वाघमारे, बालकलाकार स्वरीत प्रतीक वाघमारे आणि फाउंडर मेंबर सोनाली शिरसाट यांनी परिश्रम घेतले. विशेषतः संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या शलाका पंडित यांनी नियोजनबद्ध मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला. सिंगिंग स्टार्स कराओके स्टुडिओचे मालक बोराडे सर व बोराडे मॅडम यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम रायगडच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरला. संगीत आणि कलागुणांचा गौरव करणारा हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.