लोटे: कोकणातील हंगामी फळे व औषधी वनस्पतींचा अपव्यय टाळून त्यांची टिकाऊ आणि नैसर्गिक प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या “स्थानिक रानमेव्यापासून बहुगुणी हर्बल पावडर निर्मिती प्रकल्प” संदर्भात यशवंत विद्यालय, धामणंदच्या इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी आज एम इ एस आयुर्वेद महाविद्यालय, लोटे येथे अभ्यास सहल केली. हा प्रकल्प कोकण युवा संशोधन स्पर्धा २०२६ अंतर्गत यशवंत नॅच्युरल हर्बल पावडर उद्योग, धामणंद या संघाकडून सादर करण्यात येत आहे.
या प्रकल्पात जांभळाच्या बिया, फणसाच्या अठळ्या, कैऱ्या, कोकम, शेवग्याची पाने व गवती चहा यांसारख्या स्थानिक उपलब्ध सामग्रीचा वापर करून सोलर डिहायड्रेटर आणि ग्राइंडरच्या साहाय्याने विविध हर्बल पावडर तयार करण्याची संकल्पना आहे. जांभूळ बी पावडर, शेवगा पान पावडर, गवती चहा व सेंद्रिय काढा पावडर, आमचूर-कोकम पावडर तसेच फणस आवळा पावडर ही यातील प्रमुख उत्पादने आहेत.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन
या सहलीत श्री सुरेंद्र मुरलीधर वैद्य, डॉ. मिलिंद वैद्य , दिशांतर संस्थेच्या सौ. सीमा यादव, श्री राजेश जोष्टे तसेच यशवंत विद्यालयाचे अध्यापक श्री राजेश बंडीगरे यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना प्रकल्पासंबंधी मार्गदर्शन रसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास कस्तुरे आणि द्रव्यगुण विभाग प्रमुख डॉ. निलेश जोशी यांनी दिले.
या भेटीचे नियोजन डॉ. निनाद साडविलकर यांनी केले, तर प्राचार्य डॉ. सचिन उत्पात यांनी सहभागी सर्वांचे आभार मानले.
औषधी वनस्पतींचे शास्त्रीय ज्ञान
सहलीचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना वनस्पतींमधील औषधी गुणधर्म, द्रव्यगुण विज्ञान, वाळवण्याची व साठवण्याची आयुर्वेदीय पद्धत, चूर्ण तयार करताना आवश्यक स्वच्छता मानके, गुणवत्ता तपासणी आणि पॅकिंग यांचे शास्त्रीय मार्गदर्शन देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना प्रकल्पाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच व्यावहारिक अंमलबजावणीची दिशा मिळाली.

श्री सुरेंद्र वैद्य यांचे योगदान
श्री सुरेंद्र मुरलीधर वैद्य हे भारतातील ज्येष्ठ एरोस्पेस व संरक्षण तंत्रज्ञान तज्ज्ञ आहेत. ते गोदरेज एरोस्पेसचे कार्यकारी उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख आहेत आणि आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी आहेत.
त्यांनी इस्रोच्या अंतराळ मोहिमांसाठी तसेच डीआरडीओच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी महत्त्वाच्या घटकांच्या निर्मिती, प्रक्रिया विकास आणि चाचणी यांत मोलाचे योगदान दिले आहे.
प्रकल्पाला नवी दिशा
या भेटीमुळे विद्यार्थ्यांना स्थानिक नैसर्गिक स्रोतांचा शास्त्रीय व व्यावसायिक वापर करण्याची प्रेरणा मिळाली. रानमेव्यांचा अपव्यय टाळत आरोग्यप्रद उत्पादने तयार करण्याच्या या प्रयत्नाला आयुर्वेद तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्याने प्रकल्पाला अधिक बळ मिळाले आहे.