मुंबई: संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभेत 2023 मध्ये मंजूर झालेल्या नारी शक्ती वंदन विधेयकात महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली होती. त्याचबरोबर लोकसभेतील जागा वाढवण्याचाही विषय या प्रक्रियेशी संबंधित आहे. त्यावेळी उबाठा गट, काँग्रेस आणि इतर पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला होता. मग आताच विनाकारण या विधेयकाला विरोध का केला जात आहे, असा सवाल करत जनाब संजय राऊत आणि काँग्रेस यांची भूमिका महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या आणि आणि संविधानाच्या विरोधात असल्याचा हल्लाबोल भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्याच्या प्रक्रियेला विरोध करणे म्हणजे नारीशक्तीचा अपमान आहे असे प्रतिपादन करत श्री. बन म्हणाले, भारतीय संविधानात लोकसभेच्या जागांच्या पुनर्रचनेबाबत तरतुदी करण्यात आल्या आहेत. 2026 नंतर लोकसभेच्या जागा वाढवण्याच्या प्रक्रियेचा विचार होणार असताना महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना या विषयांना एकत्रितपणे विरोध करणे अयोग्य आहे. संजय राऊत यांना संविधानातील तरतुदींची माहिती नाही. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान करायचा आहे. महिलांना राजकीय व्यवस्थेत अधिक प्रतिनिधित्व मिळणे ही लोकशाही अधिक बळकट करण्याची गरज आहे. त्यामुळे महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून सर्व पक्षांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
लोकसंख्येच्या प्रमाणात लोकप्रतिनिधींची संख्या असली पाहिजे, हे घटनात्मक सूत्र असून त्यानुसारच खासदारांची संख्या निश्चित केली जाते. कोणत्या राज्यातून किती खासदार असावेत, हे कोणी राजकीय पक्ष किंवा नेता ठरवत नसून त्यासाठी संविधानातील तरतुदींचे पालन केले जाते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती करताना लोकसंख्येच्या प्रमाणात लोकप्रतिनिधित्व असण्याचे तत्त्व मांडले होते. लोकसंख्या वाढत असताना लोकप्रतिनिधींची संख्या आणि प्रतिनिधित्व यांचाही विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकसभेतील खासदारांची संख्या निश्चित करण्याचा विषय हा कोणाच्या राजकीय इच्छेचा नसून घटनात्मक प्रक्रियेचा भाग असल्याचे श्री. बन यांनी नमूद केले.
निवडणुकांमधील पराभवाचे खापर कधी ईव्हीएमवर, कधी न झालेल्या मतचोरीवर, तर कधी निवडणूक आयोगावर फोडणाऱ्या काँग्रेस आणि उबाठा गटाला आता 2029 च्या पराभवाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच आता 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुकीतील संभाव्य पराभवाचे कारण शोधण्याचे काम विरोधकांनी आतापासूनच सुरू केले आहे. महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना यांच्यामुळे पराभव झाला, असे सांगण्याची तयारी विरोधक करत आहेत. भाजपाचा विजय होणार की पराभव, हे संजय राऊत किंवा अन्य कोणताही राजकीय नेता ठरवत नाही, तर देशातील जनता ठरवते, असा टोला श्री. बन यांनी लगावला.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून महिला आरक्षण विधेयकाचे स्वागतच केले असते. महाराष्ट्रातून प्रतिभाताई पाटील यांचे नाव देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीपदासाठी पुढे आले तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. महिलांना देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर संधी मिळावी, ही त्यामागील सकारात्मक भूमिका होती, याची आठवण श्री. बन यांनी केली.
संजय राऊत हे महिला आरक्षण आणि संविधानविरोधी; भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा हल्लाबोल…
