मुंबई | : झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) योजनेंतर्गत रहिवाशांना भेडसावणाऱ्या वाढीव मेंटेनन्स खर्चाच्या समस्येवर आमदार अतुल भातखळकर यांच्या मागणीला यश आले आहे. राज्य सरकारने यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.

SRA सोसायट्यांसाठी ठेवण्यात येणारा कॉर्पस फंड 40 हजार रुपयांवरून वाढवून 1 ते 1.5 लाख रुपये केला जाणार आहे. इमारतीच्या उंचीनुसार निधी निश्चित करण्यात येईल, त्यामुळे भविष्यातील देखभाल खर्चाचा बोजा कमी होणार आहे.

तसेच, लिफ्ट आणि सामाईक भागांसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार असून, इमारतीला ओसी देण्यापूर्वी सोलार पॅनल बसवणे सक्तीचे केले जाणार आहे.

या निर्णयांमुळे SRA टॉवरमधील हजारो कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे आमदार भातखळकर यांनी सांगितले.