चिपळूण – पुरधोका टाळण्यासाठी चिपळूण शहरातील एका नागरिकाने धाडसी पाऊल उचलले आहे. खंड परिसरातील अभियंता प्रमोद वेल्हाळ यांनी त्यांच्या घराचे बांधकाम न पाडता जॅकच्या सहाय्याने संपूर्ण घर सहा फूट उंच करण्याचे काम सुरू केले आहे.

प्रथम टप्प्यात घर सव्वा दोन फूट उंच झाले असून, हे चिपळूण शहरातील अशा प्रकारचे पहिले प्रयोग मानले जात आहे. चेन्नईतील एका खासगी कंपनीमार्फत हे काम करण्यात येत असून, कंपनीकडून घर सुरक्षितपणे उचलण्यासाठी अत्यंत मजबूत साहित्य वापरण्यात आले आहे.

मूळचे नरवण (ता. गुहागर) येथील रहिवासी प्रमोद वेल्हाळ हे जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त आहेत. २०१५ मध्ये त्यांनी खंड परिसरात सुमारे १३०० चौरस फुटांचे दुमजली घर बांधले होते. दरवर्षी पावसाळ्यात घरात पाणी शिरत असल्याने मोठी अडचण निर्माण होत असल्यामुळे त्यांनी घर पाडून नव्याने बांधण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घर उंच करण्याचा निर्णय घेतला.

या प्रक्रियेत प्रथम घराचा बेड काँक्रीट तोडून खोदाई करण्यात आली, पिलर मोकळे करून लिंटेलखाली मजबूत बीम टाकली गेली आणि त्यावर जॅक बसवण्यात आले. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या कामात १५० जॅक वापरण्यात आले असून सुरुवातीला मोठ्या संख्येने कामगार होते, पण आता पाच कामगार नियमितपणे काम पाहत आहेत.

या तंत्रज्ञानामुळे शेकडो टन वजनाची इमारत सुरक्षित उचलली जात असून, जॅकद्वारे घर उंचावल्यावर कोसळण्याचा किंवा तडे जाण्याचा धोका नाही, असे कंपनीकडून लेखी हमी दिली गेली आहे. यापूर्वी लांजा तालुक्यातील आंजणारी येथे मशिदीचे स्थलांतर करण्यासाठी हे तंत्रज्ञान यशस्वीरित्या वापरण्यात आले होते. चिपळुणात घर उंचावण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे भविष्यात पुरप्रवण भागातील नागरिकांसाठी हा आदर्श ठरण्याची शक्यता आहे.