खेड (चंद्रकांत बनकर) : उन्हाळ्याच्या काळात विशेषतः एप्रिल आणि मे महिन्यात खेड तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र यावर्षी कोणत्याही गावाला पाण्याच्या टंचाईची झळ बसू देणार नाही, एकही वाडी किंवा गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन खेड पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती सुनील मोरे यांनी दिले आहे.
शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम तसेच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली टंचाईग्रस्त भागांसाठी योग्य नियोजन करण्यात येत असून गरजेनुसार त्या गावांना मुबलक पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मंगळवार दिनांक १७ मार्च रोजी आमदार तथा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या सूचनेनुसार खेड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांच्या संदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कृती आराखड्यानुसार नियोजनात्मक चर्चा होणार असून पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत निर्णय घेतले जाणार आहेत.
तालुक्यातील ज्या गावांमधून किंवा वाड्या-वस्त्यांमधून पाण्याची मागणी येईल, त्या सर्व ठिकाणी शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात येईल, असेही उपसभापती मोरे यांनी स्पष्ट केले.
तसेच गेल्या काही वर्षांपासून खेड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होत असल्याचे सांगत आमदार तथा गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या माध्यमातून भविष्यात तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या पूर्णपणे शून्यावर आणण्याचा निर्धार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
गरज पडेल त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण भासू देणार नाही, असा विश्वासही उपसभापती सुनील मोरे यांनी व्यक्त केला.
खेड तालुक्यात एकही गाव तहानलेले राहणार नाही – उपसभापती सुनील मोरे
