चिपळूण : तालुक्यातील मुर्तवडे येथील सुतारवाडीमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या नळपाणी योजनेच्या कामातील अनियमिततांबाबत जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांनी लक्ष वेधताच प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी उमा भारती पाटील मॅडम यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत, संबंधित विभागाचे अधिकारी, ठेकेदार तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पाहणीदरम्यान ग्रामस्थांनी जलजीवन मिशन योजनेच्या कामातील अनियमिततांबाबत तसेच सुतारवाडीतील पाणीप्रश्नाबाबत आपली नाराजी व्यक्त करत सध्याची परिस्थिती अधिकाऱ्यांसमोर मांडली.
यावर गटविकास अधिकारी उमा भारती पाटील मॅडम यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत हा प्रश्न गांभीर्याने घेतला असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी तात्काळ चर्चा करून सुतारवाडीतील पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच या ठिकाणी तातडीने नवीन विहीर बांधण्याचे काम सुरू करण्यात येईल, असा शब्द त्यांनी जिल्हा परिषद सदस्या व ग्रामस्थांना दिला.दरम्यान, जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांनी सांगितले की, “ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. जलजीवन मिशनसारख्या महत्वाच्या योजनेचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाहणी केली ही समाधानकारक बाब असून सुतारवाडीतील पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जावीत,” असे त्यांनी सांगितले
मुर्तवडे सुतारवाडी पाणीप्रश्नाकडे जि.प.सदस्या शिवानी सावंत यांनी लक्ष वेधताच प्रशासनाची तात्काळ दखल
