रायगड . (धम्मशील सावंत )
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रायगड जिल्हाध्यक्ष शिवश्री वैभव हरिश्चंद्र सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली
दिनांक ७ नोव्हेंबर, २०२५ रोजी संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला चवदार तळ्याच्या जलसुध्दीकरणासोबत संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्यासंबंधीचे निवेदन देऊन सर्वप्रथम सर्वांचे या संवेदशील प्रश्नांकडे लक्ष वेधले होते.

हे निवेदन महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच डीवायएसपी काळे साहेबांच्या उपस्थितीत महाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले होते.
या निवेदनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाड चवदार तळ्याकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष पाहून भीम अनुयायांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
“महाड हे केवळ एक ठिकाण नाही, तर ते भारताच्या सामाजिक समतेच्या लढ्याचे पवित्र रणांगण आहे. २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे केलेला चवदार तळे सत्याग्रह हा मानवाच्या मूलभूत अधिकारांसाठीचा जगातील पिण्याच्या पाण्याचा पहिला संघर्ष आहे.चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची आठवण म्हणून असंख्य इतिहास प्रेमी, भीम अनुयायी आणि पर्यटक या तळ्याला मोठ्या आत्मियतेने लाखोंच्या संख्येने दरवर्षी भेट देत असतात, याच माध्यमातून स्वतः महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या तळ्यातील स्वतःच्या ओंझलीने प्राशन केलेले हे पाणी येथील प्रत्येक शिव फुले शाहू आंबेडकरी अनुयायांना तीर्थासमान पवित्र असताना येथील पाण्याला आलेले दुर्गंधीचे आणि शैवालीचे स्वरूप म्हणजे येथील प्रशासनाचे केवळ दुर्लक्षच नव्हे तर महामानव, संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक, समतावादी कार्याची विटंबना करण्यासारखेच आहे.
चवदार तळ्याच्या पाण्यासंदर्भात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ऐतिहासिक लढ्यामुळे महाड शहराचे नाव क्रांतीभूमी म्हणून सुवर्णाक्षराने कोरले गेले असताना आपले दुर्लक्ष व्हावे हे अत्यंत खेदाची बाब असून वरील सर्व संवेदनशील बाबींचा आपण गांभीर्याने विचार करून तत्काळ चवदार तळेमधील पाण्याची पूर्णपणे स्वच्छता करून हे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी तसेच तळ्याच्या परिसराची योग्य ती डागडुजीसह सुशोभीकरण करण्याबाबत कायमस्वरूपी ठोस पाऊले उचलून त्वरित अंमलबजावणी करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड चवदार तळ्यावर तीव्र स्वरूपाचे आमरण उपोषण स्वीकारेल तरीदेखील या घटनेकडे दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरून हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल आणि या पूर्ण प्रकारास येथील प्रशासन जबाबदार असेल असा सूचक इशारा देण्यात आला होता.

संभाजी ब्रिगेडच्या या इशारावजा आक्रमक आंदोलनात्मक निवेदनाची राज्यासह देशभरातील असंख्य वृत्तवाहिन्या तसेच वृत्तपत्रांनी दखल घेत ही बातमी सर्वत्र प्रसारित केली होती. या माध्यमातून राज्यासह देशभरातील समाजबांधव आणि भीम अनुयायांकडून संभाजी ब्रिगेडने घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत करण्यात आले होते.
दरम्यान, संभाजी ब्रिगेडने उपस्थित केलेल्या या भूमिकेला अनुसरून विविध राजकीय पक्षांनीही आवाज उठवत प्रशासनाचे लक्ष वेधले तसेच चवदार तळ्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता या ठिकाणाच्या जलशुद्धीकरण आणि सुशोभीकरणासाठी निधी देण्याची मागणी कालांतराने वाढत गेली. यानंतर महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभागाचे मंत्री नामदार संजय शिरसाट यांनी विशेष बाब म्हणून ५५ कोटी ७९ लाख ८५ हजार ६५३ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निधीमधून करण्यात येणारी कामे महाड नगर परिषदे मार्फत केली जाणार आहेत.
यापूर्वी सामाजिक न्याय विभागाकडून सात कोटी रुपयांचा निधी या परिसरातील विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून चवदार तळ्याचे सुशोभीकरण, तळ्याभोवती संरक्षक भिंत, तळ्यातील पाण्याचे जलशुद्धीकरण आणि परिसरातील विकासकामे केली जाणार आहेत.

संभाजी ब्रिगेडने उपस्थित केलेल्या या प्रश्नानंतर आणि विविध राजकीय पक्षांच्या पाठपुराव्यानंतर अखेर चवदार तळ्याच्या विकासासाठी निधी मंजूर झाल्याने इतिहासप्रेमी, शिव फुले शाहू आंबेडकरी जनता आणि भीम अनुयायींमार्फत समाधान व्यक्त होत आहे.