चिपळूण : चिपळूण येथे सोमवार, दिनांक 23 मार्च 2026 रोजी एफएसएसएआयतर्फे हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थांचे निर्माते तसेच किराणा व्यापाऱ्यांसाठी आवश्यक असलेला ‘फूड सेफ्टी ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन’ हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
ग्राहकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अन्नधान्य तसेच अन्नपदार्थांचे योग्य पद्धतीने वितरण करण्यासंदर्भात हे प्रशिक्षण होते. याचा लाभ चिपळूण, गुहागर, खेड तालुक्यातील व्यापारी वर्गाने घेतला. याचे मार्गदर्शन पुणे येथील अंकुश जोगदंड यांनी केले.
प्रशिक्षणादरम्यान त्यांनी अन्नपदार्थ बनवताना तसेच विक्री करताना अन्नपदार्थ उत्तम पद्धतीने कसे वितरित करता येतील, यासंदर्भात घ्यावयाची काळजी अत्यंत सविस्तरपणे सांगितली. हॉटेलमधील किचन, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भांड्यांची निवड, स्वच्छता, शुद्ध पाण्याचा वापर, कामगारांची आरोग्य तपासणी या मुद्द्यांवर सखोल विवेचन केले. तसेच किराणा दुकानातील गोदामामध्ये धान्य साठ्याचे नियोजन कसे करावे, याचीही माहिती दिली.
विविध रंग तसेच सरकारमान्य रासायनिक पदार्थांचा संतुलित वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणादरम्यान व्यापाऱ्यांच्या शंका व प्रश्नांना जोगदंड सरांनी उत्तरे दिली. सदर प्रशिक्षणास रत्नागिरी जिल्ह्यातील अन्नसुरक्षा अधिकारी भाग्यश्री परदेशी मॅडम, तृप्ती घरत मॅडम व संकेत कोनेरी साहेब उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिपळूण किराणा व्यापारी संघाने नियोजन केले.
