पोलादपूर (शैलेश पालकर) – दुर्गम, डोंगराळ भागातून कणखर तरुणांना लढाई प्रशिक्षणात पारंगत करून छत्रपती शिवाजी महाराजांनी अशक्य अशी स्वराज्य निर्मिती केली. आताच्या युगात सर्व सुविधा उपलब्ध असताना तरुणांना देशासाठी आणि देशांतर्गत सुरक्षेसाठी घडविणे शक्य असल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

पोलादपूर तालुक्यातील दिविल येथे ब्रह्मध्वजा सोशल फाऊंडेशन संचालित आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, पोलीस भरती, क्रीडा तसेच आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम शिक्षण संस्थेचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना. आठवले बोलत होते.

याप्रसंगी मंत्री भरतशेठ गोगावले, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत कळंबे व डॉ. निलेश कुंभार, रिपाइंचे कोकण प्रांताध्यक्ष प्रकाश मोरे, पोलादपूर पं. स. सभापती अविनाश शिंदे, पं. स. सदस्या साक्षी कांबळेकर, माजी सैनिक संघटनेचे पोलादपूर अध्यक्ष वाय. सी. जाधव, माजी सैनिक संघटनेचे महाड अध्यक्ष कॅप्टन किसन सकपाळ, तुर्भे खुर्द सरपंच गोविंद उतेकर, धारवली सरपंच विलास सकपाळ, दिविल सरपंच सागर देवे, माटवण सरपंच बाया वाघे, सवाद सरपंच शर्मिला उतेकर, तुर्भे बुद्रुक सरपंच सुरेखा गोळे, कालवली सरपंच किरण पवार, पार्ले सरपंच आशा पवार तसेच समीर चिपळूणकर, ब्रह्मध्वजा सोशल फाऊंडेशनचे राष्ट्रीय संस्थापक शशांक यादव, शिक्षण प्रसारक संस्था सवाद-धारवलीचे संचालक संजय महाडीक व कार्यवाह दत्तात्रेय उतेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी ना. आठवले यांनी पुढे त्यांच्या खास शैलीत मंत्री भरतशेठ गोगावले यांचे कौतुक करताना, “आपणही राज्यात मंत्री होतो, आता केंद्रात मंत्री आहोत,” अशी आठवण सांगितली. ब्रह्मध्वजा सोशल फाऊंडेशनचे काम राष्ट्रीय संस्थापक शशांक यादव यांच्या माध्यमातून होत असून, स्वतःकडून सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

प्रारंभी राज्याचे रोहयो, खारजमीन विकास आणि फलोत्पादन मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्मभूमीत आपण जन्मलो असल्याचे सांगितले. येथील जनतेने चार वेळा निवडून दिल्यानंतर राज्यात मंत्रीपद मिळाले आहे. या सत्तेच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील तरुणांना देशासाठी घडविणाऱ्या या शिक्षण संस्थेला आपण सर्व प्रकारची मदत करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी माजी सैनिक संघटनेचे पोलादपूर अध्यक्ष वाय. सी. जाधव यांनी देशभक्तीपर काव्य सादर केले. यावेळी आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, पोलीस भरती, क्रीडा तसेच आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकविण्यासाठी प्रशिक्षक म्हणून आलेल्या जगदाळे यांचाही सत्कार करण्यात आला.