चिपळूण : कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण येथील विभागीय कार्यालयात हल्लाबोल करण्यात आला. प्रादेशिक अधिकारी श्री. कुलकर्णी हे अपघातग्रस्त झाल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत क्षेत्र अधिकारी श्री. शिंगारे यांच्या उपस्थितीत सदर बैठक पार पडली. यावेळी भरत लब्दे, पंकज दळवी, सिराजभाई दलवाई, अल्ताफ कादरी, तुळशीराम पवार, डॉ. शमीना परकार, स्वाती भोजने, वीणा जावकर यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

यावेळी पुढील मागण्या करण्यात आल्या :

  • गेल्या आठवड्यात लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचा सीईटीपीकडे जाणारा टँकर स्थानिक नागरिकांनी रोखून धरला. यामध्ये पीएफएएससारखे घटक असल्याचा संशय स्थानिक नागरिकांना होता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा टँकर पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणारा होता. असे असताना रासायनिक कारखान्याच्या वेस्ट वॉटरसाठी हा टँकर का वापरण्यात आला? तसेच, यानंतर या टँकरमधून पिण्याचे पाणी नागरिकांना दिले गेले, तर मोठा अनर्थ घडू शकतो, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता टँकरचा मालक, चालक तसेच कंपनी व्यवस्थापनावर सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
  • गेल्या महिन्यात सोनगाव येथे पाच-सहा दुभती जनावरे रसायनमिश्रित पाण्यामुळे दगावली. याची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांना भरपाई दिली जावी.
  • आठ जानेवारी रोजी झालेल्या मोर्च्यानंतर अनेक गावांत बैठका घेऊन आम्ही प्रत्यक्ष स्थानिकांशी संवाद साधला. त्यावेळी नागरिकांनी अनेक गंभीर बाबी मांडल्या. यामध्ये अनेक कारखान्यांनी आपापल्या हद्दीत बोअरवेल करून सांडपाणी व टाकाऊ रसायने भूगर्भात जिरवण्याचा प्रकार केल्याचे सांगितले. यामुळे भूगर्भातील पाणी दूषित झाले आहे. या सर्व बाबींची तज्ज्ञ व स्थानिक नागरिकांसह समिती नेमून पाहणी करावी. चौकशीअंती दोषी आढळल्यास संबंधित कारखान्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
  • संपूर्ण लोटे एमआयडीसी परिसरातील अनेक गावांमध्ये आंबा, काजू, रानमेवा आदी पिकांचे कायमस्वरूपी नुकसान झाले आहे. याची जबाबदारी ठरवून त्या शेतकऱ्यांना संबंधित विभागाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी.
  • सीईटीपीमधून अनेक वेळा प्रक्रिया न करता सांडपाणी सोडण्यात येते. त्यामुळे दाभोळ खाडी प्रदूषित झाली असून मच्छीमार बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचीही जबाबदारी निश्चित करून त्यांना भरपाई देण्यात यावी.
  • नियमबाह्य कामांना पायबंद घालण्यात यावा.

अशा महत्त्वपूर्ण मागण्यांबरोबर काही पूरक मागण्याही यावेळी करण्यात आल्या. यावर सकारात्मक प्रतिसाद देत एमपीसीबीचे अधिकारी श्री. शिंगारे यांनी, “कुलकर्णी साहेबांशी चर्चा करून आपण मांडलेल्या मुद्द्यांवर तातडीने निर्णय घेण्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असे सांगितले.

याप्रसंगी सुवर्णा बेंडके, विनायक जाधव, चंद्रकांत मोहिते, बी. डी. कदम, बाबा चव्हाण, बाळशेठ लांबे, राजा लांबे, मन्सूर सय्यद, कासिम सय्यद, केशव लांबे आदी कोकण पर्यावरण संघर्ष समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.