रोहा (अल्ताफ चोरडेकर) : रोहा तालुक्यातील बाहे हे गाव भाजीपाला लागवडीसाठी गेली कित्येक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. येथील स्थानिक शेतकरी पारंपरिक लागवडीपासून विविध प्रयोग करत शेतीतून चांगले उत्पादन काढून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. यातीलच बाहे गावातील प्रयोगशील शेतकरी खेळू थिटे यांनी कमी आकाराच्या शेतजमिनीत शास्त्रोक्त पद्धतीने मिरचीची लागवड केली. या माध्यमातून ते पिकातून भरघोस उत्पादन घेत आहेत. त्यांचा हा यशस्वी प्रयोग नव्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मुळातच खेळू थिटे यांच्याकडे कमी शेतजमीन असूनही जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर काळ्या मातीतून चांगले उत्पन्न मिळते, हे त्यांनी गेल्या कित्येक वर्षांत सिद्ध केले आहे. कमी आकाराच्या शेतजमिनीत लाखोचे उत्पन्न कसे काढता येते, याचे त्यांनी नव्या शेतकऱ्यांसमोर उदाहरण ठेवले आहे. सातत्याने शेतीमध्ये प्रयोग करत असल्याने कृषी क्षेत्रात भात लागवडीपासून अन्य पुरस्कार त्यांना शासनासह विविध संस्थांकडून मिळाले आहेत.
स्वतःची दीड एकर व सामायिक अडीच एकर, असे एकूण चार एकर शेतजमिनीत त्यांनी यावर्षी लागवड केली आहे. यावर्षी पाऊण एकरमध्ये त्यांनी ‘सितारा’ या जातीची मिरचीची लागवड नोव्हेंबरच्या सुमारास केली होती. जवळजवळ ८० हजार रुपयांच्या आसपास त्यांना या लागवडीचा व अन्य खर्च आला. चांगले नियोजन व संगोपन केल्याने मिरचीचे पीक आता बहरात आहे. शेतीचे उत्पादन सुरू झाले आहे.
चांगले मिरचीचे पीक बहरत असताना त्यांनी आतापर्यंत तीन तोडे केले आहेत. जिल्ह्यातील व्यापारी शेतावर मिरची खरेदी करण्यासाठी येत आहेत. यावेळी त्यांना ४० ते ६० रुपये प्रति किलो भाव मिळाला आहे. आतापर्यंत तीन तोड्यांमधून सरासरी दीड लाखांच्या आसपास उत्पन्न मिळाले आहे. अजूनही दोन ते तीन तोडे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंदाजे किमान अडीच लाखांच्या आसपास नफा मिरची या पिकातून मिळण्याची शक्यता आहे. भावात चढ-उतार सातत्याने होत आहे; मात्र उत्पादन अजूनही सुरू आहे.
त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पाऊण एकरमध्ये त्यांनी यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर कलिंगडाची लागवड केली आहे. अडीच हजार रोपे त्यांनी पाऊण एकरमध्ये लावली होती. कलिंगडालाही चांगले पीक आल्याने त्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे. सरासरी १५ रुपये प्रति किलो असा भाव मिळाला असून जवळजवळ १० टन कलिंगडाचे उत्पादन झाले आहे. किरकोळ बाजारात त्याची विक्री होत आहे. मिरचीसोबतच कलिंगडातूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
सध्या ते पाऊण एकरमध्ये भेंडीची लागवड करत आहेत. ‘राधिका’ या जातीची लागवड त्यांनी केली आहे. सातत्याने शेतीमध्ये प्रयोग करणे, वेगवेगळ्या जातींची पिके घेणे, जिद्द, मेहनत व नियोजन यामुळे खेळू थिटे यांचे शेतीतून चांगले अर्थकारण होत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, रोहा सारख्या बाजारपेठेत स्थानिक शेतकऱ्यांना उत्पादन विक्रीसाठी जागा उपलब्ध नसल्याने त्यांना स्थानिक बाजारपेठ मिळत नाही. स्थानिक बाजारपेठेत बसण्यासाठी जागा मिळाल्यास त्यांना अधिक चांगले उत्पन्न मिळू शकते. यासह रोहेकरांना ताज्या भाज्या मिळू शकतात, अशी प्रतिक्रिया प्रगतशील शेतकरी खेळू थिटे यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काम करणार असून स्थानिक शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे मत शेतकरी संघटनेचे नेते अनंत थिटे यांनी व्यक्त केले आहे.
