खोपोली (दत्तात्रय शेडगे) : मुंबई–पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात काल रात्री एका कारला भीषण आग लागली. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली.
मुंबई–पुणे जुन्या महामार्गावरून क्रेटा कार (क्रमांक MH 14 JM 5999) चालक नितीन गजानन साळुंखे (वय ४१, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे) हे खोपोलीहून पुण्याकडे जात असताना, कार खिंडीत पोहोचल्यावर अचानक गाडी गरम होऊन भीषण आग लागली. कारला आग लागल्याचे चालकाच्या तात्काळ लक्षात आल्याने त्यांनी कार थांबवून बाहेर पडले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
या घटनेची माहिती मिळताच खोपोली अग्निशमन दल, आयआरबी टीम आणि अपघातग्रस्त पथकाचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली.
