नागोठणे :- नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या १४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात खासदार सुनिल तटकरे यांनी दापोलीतील पत्रकार यशवंत कांबळे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत त्यांना सन्मानित केले. समाजाभिमुख आणि जबाबदार पत्रकारिता करत त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न प्रभावीपणे मांडले असून, त्याचेच फलित म्हणून त्यांना हा सन्मान देण्यात येत असल्याचे तटकरे यांनी नमूद केले.
श्री जोगेश्वरी माता प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना तटकरे म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक सोशल मीडिया युगातही यशवंत कांबळे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सत्य, वस्तुनिष्ठता आणि समाजहित यांचा संगम त्यांच्या लेखनातून दिसून येतो, हे विशेष उल्लेखनीय आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी यशवंत कांबळे (दापोली) यांना कै. तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार देऊन खासदार तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला.
तसेच नागोठणे पत्रकार असोसिएशन गेल्या १४ वर्षांपासून पत्रकार, मान्यवर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून समाजात सकारात्मकतेचा संदेश देत असल्याचे सांगत त्यांनी संस्थेच्या कार्याचेही कौतुक केले
