खेड : – भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात भारतीय जनसंघाचे संस्थापक अंत्योदय व एकात्म मानवतावादाचे प्रणेते, थोर विचारवंत, कुशल संघटक, राष्ट्रनिष्ठ पत्रकार,’पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ अत्यंत उत्साहात राबविले जात आहे. या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत भाजपा उत्तर खेड मंडल वतीने या अभियानाचा शुभारंभ तालुक्यातील बोरघर जोशी फार्म येथे करण्यात आला .
या प्रशिक्षणास भाजपा नेते तथा खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, भाजपा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दापोली विधानसभा प्रमुख तसेच नवनिर्वाचित जालगाव पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत. यासोबतच महाभियानाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रशिक्षण अभियानास शुभेच्छा दिल्या. महान तत्त्वज्ञ, राष्ट्रनिष्ठ विचारवंत आणि एकात्म मानववाद या अद्वितीय तत्वज्ञानाचे प्रवर्तक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने हे महाभियान सुरू झाले आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. राष्ट्रसेवेचा मार्ग हा केवळ राजकारणाचा नव्हे, तर समाजकारणाचा आणि संस्कारांचा मार्ग आहे, हे दीनदयाळजींनी आपल्या विचारातून आणि कार्यातून देशाला दाखवून दिले. त्यांच्या आदर्शांमधून प्रेरणा घेऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यकर्त्यांना सक्षम बनविणे, हे या प्रशिक्षण महाभियानाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे यावेळी नमूद केले.
आजच्या वेगाने बदलणाऱ्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत कार्यकर्ते सक्षम, अभ्यासू आणि समाजाशी जोडलेले असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशिक्षण महाभियान हे कार्यकर्त्यांना विचार, आचरण आणि संघटन या तीनही स्तरांवर सक्षम बनविणारे एक प्रभावी व्यासपीठ आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित होतील, समाजातील विविध घटकांशी संवाद अधिक प्रभावी होईल आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत त्यांचे योगदान अधिक बळकट होईल, असाही विश्वास उपस्थित मान्यवर यांनी व्यक्त केला.
यावेळी रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, अल्पसंख्यांक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहिबोले, नगरसेविका सौ.वैभवी खेडेकर, नगरसेविका सौ.स्वप्नाली चव्हाण, सचिन होडबे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अँड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, माजी नगराध्यक्षा सौ.उर्मिला उदय पाटणे-शेट्ये, दापोली महिला तालुका अध्यक्षा सौ.जया साळवी, प्रसाद मांडवकर, माजी नगरसेवक संदेश भुवड, भाजपा प्रणित रिक्षा सेल जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी, राहुल पाटणे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, अक्षय संगारे, प्रदीप भोसले व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बोरघर येथे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ उत्साहात !
