लांजा : तालुक्यात गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अचानक पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका तालुक्यातील विविध गावांना बसला असून, विलवडे आणि खावडी येथे घरे व गोठ्यांचे नुकसान झाले आहे. तर शिपोशी येथे आंबा बागांनाही मोठा फटका बसला आहे. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गुरुवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास लांजा तालुक्यात अचानक वातावरण ढगाळ झाले आणि जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. शहरासह तालुक्यात काही ठिकाणी गारांचा वर्षावही झाला. या पावसात विलवडे (वाणीवाडी) येथे जोरदार वाऱ्यामुळे आंब्याचे झाड उन्मळून पडून ते रिया खेतल यांच्या घरावर कोसळले. या घटनेत घराचे अंशतः नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी टळली. तसेच खावडी गावातही वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला असून, येथील एका शेतकऱ्याचा गोठा कोसळून त्याचे नुकसान झाले आहे. या घटनेतही कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आर्थिक नुकसान झाले आहे.

याशिवाय, शिपोशी येथे पावसासह जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेतकरी प्रभाकर पुरुषोत्तम शिरवटकर यांच्या आंबा बागेतील आंबे गळून पडले असून, त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या आंबा हंगामाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत आहेत.

दरम्यान, गुरुवारी झालेल्या या अवकाळी पावसानंतर शुक्रवारी दुपारीदेखील तालुक्यात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. परंतु, काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा जाणवत होता. या सतत बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत पडला असून हवालदिल झाला आहे.