महाड : राज्यातील विविध क्षेत्रातील तब्बल 42 नामवंतांचा सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व आई फाऊंडेशन आयोजित स्वराज्य भूमी रायगड गौरव संमेलनात करण्यात आला.
याप्रसंगी ‘लागिरं झालं जी’ फेम संतोष पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगारनेते राज पार्टे यांच्यासह संमेलनाध्यक्ष विनोदराव मोरे व संमेलनाध्यक्ष कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, रायगड जिल्हा अध्यक्ष राकेश खराडे, स्वागताध्यक्ष डॉ.बी.एन.खरात, उद्योजक संचालक उदय वाघेरे आदी मान्यवरांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील तसेच कोकणासह राज्यातील विविध क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार महाड नांगलवाडी फाटयाजवळील सावित्रीपुलालगतच्या हॉटेल फाऊंटेन इनमध्ये एका दिमाखदार सोहळयात करण्यात आला.
याप्रसंगी पोलादपूरचे ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांना द ग्रेट जर्नालिझम आयकॉन पुरस्कार, मनसेचे कामगारनेते राज पार्टे यांना छ.शिवराय कर्तृत्वभूषण पुरस्कार, ग्रामपंचायत अधिकारी अनिल पवार यांना आदर्श ग्रामपंचायत सेवा पुरस्कार, ज्येष्ठ समाजसेविका कांचन बुटाला यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार, डॉ.विनोदराव मोरे यांना भारत समाज गौरव पुरस्कार, कृषीनिष्ठ शेतकरी भगवान अहिरे, आदर्श सरपंच पुरस्कार प्रमोद चव्हाण यांना तसेच महाडचे पत्रकार सुरेश शिंदे यांच्यासह अन्य विविध क्षेत्रातील नामवंतांना देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्याचे सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांना द ग्रेट जर्नालिझम नॅशनल आयकॉन पुरस्कार समृध्दी प्रकाशनचे संस्थापक आणि स्वागताध्यक्ष डॉ.बी.एन.खरात यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
