मुंबई : आदरणीय शरद पवार यांच्या आजच्या शपथविधीमुळे दिल्लीत एक मोठा विरोधक म्हणून ते उभे राहतील. विरोधकांना त्यांचे मार्गदर्शन कामी येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.
शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी देण्याबाबत सांगण्यात आले होते. त्यांची वैयक्तिक निवडणूक लढण्याची इच्छा नाही, असे त्यांनी सांगितले आहे. आणखी दोन जणांनी आमच्याकडे उमेदवारी मागितली होती. दुपारी १ वाजता त्यांनी नकार दिल्यानंतर आम्ही गोविंदराव मोकाटे यांना उमेदवार म्हणून निश्चित केले आहे, असे शशिकांत शिंदे म्हणाले.
शशिकांत शिंदे म्हणाले की, अजितदादा पवार यांच्या निधनानंतर आम्ही ठरवले होते की उमेदवार द्यायचा नाही. राहुरीबाबत अशी भूमिका आम्ही जाहीर केली नव्हती, त्यामुळे आम्ही दुटप्पी भूमिका घेतली असे होत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, काँग्रेस हा वेगळा पक्ष आहे. त्यांनी काय करावे, हे त्यांनी ठरवावे. देवेंद्र फडणवीस यांचे काम फक्त राहुरीपुरते मर्यादित नाही, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठीही ते फोन करतात. ते अनेकांना अनेक आश्वासने देत असतात. देवेंद्र फडणवीस यांची आश्वासनांची यादी खूप मोठी आहे. ते कोणाची आश्वासने कशी पूर्ण करणार, हे त्यांनाच माहीत, असेही त्यांनी म्हटले.
शशिकांत शिंदे म्हणाले की, अनेक वेळा ही चर्चा झाली आहे की त्यावेळी राजीनामा झाला असता तर वेगळे काही घडले नसते. पण आता त्यावर काय बोलायचे? संजय राऊत यांनी व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून लिहिले असेल. ही चर्चा खूप जुनी आहे. आता आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. संजय राऊत हे स्वतंत्र व्यक्ती आहेत, असे शशिकांत शिंदे म्हणाले.
यावर सविस्तर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, मी अंजली दमानिया यांचे चहापाण्याचे निमंत्रण स्वीकारणार आहे आणि त्यांच्याकडून माहिती घेणार आहे की त्यांच्याकडे ही माहिती कुठून आणि कशी येते. आम्ही विरोधात आहोत, त्यामुळे आम्हालाही याचा फायदा होईल. आम्ही विरोधक म्हणून आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही. निदान दमानिया यांचा आवाज तरी सरकारपर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले.