वावर्ले ( राकेश खराडे ) : येथील मैदानावर चौक विभागप्रमुख यांच्या वतीने भव्य दिव्य प्रकाशझोतातील सामन्यांचे आयोजन रविवार, दि. ६ एप्रिल ते ९ एप्रिलपर्यंत करण्यात आले आहे. या सामन्यांचे उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, माजी आमदार मनोहर भोईर, बबन पाटील आणि सरपंच प्रिया प्रफुल्ल विचारे यांच्या उपस्थितीत पार पडले.
यापूर्वी श्रीगणेशाचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मैदानात उतरून तीन चेंडूंचा खेळ केला. त्यांना माजी आमदार मनोहर भोईर यांनी गोलंदाजी केली. खेळपट्टीवर खेळताना आदित्य ठाकरे यांनी तीन चेंडूंवर दोन दमदार चौकार लगावले. यानंतर पहिल्या फेरीतील दोन्ही संघांसोबत हस्तांदोलन करून क्रिकेटचा आनंद घेतला.
यावेळी जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, बबनदादा पाटील, सरपंच प्रिया प्रफुल्ल विचारे, जिल्हा परिषद सदस्या वैशाली खैर, पंचायत समिती सदस्या कमळ भस्मा, उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, चौक विभागप्रमुख प्रफुल्ल विचारे, दीपक पाटील, शिवाजी माळी, मनोहर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. फटाक्यांची आतषबाजी करून प्रकाशझोतातील सामन्यांना सुरुवात करण्यात आली. सामने पाहण्यासाठी क्रीडारसिकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले.
