चिपळूण : चिपळूण पागे परिसरातील रहिवासी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले प्रसाद गिजरे यांचे सुपुत्र अभिषेक गिजरे यांची संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) नामिबिया येथील कंट्री लेव्हल प्रोग्रामसाठी कम्युनिकेशन सपोर्ट म्हणून संपूर्ण भारतातून एकमेव निवड झाली आहे. ही चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
अभिषेक गिजरे यांची या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय जबाबदारीसाठी निवड झाल्यानंतर त्यांनी नामिबियाची राजधानी विंडहोक येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात रुजू होत आपल्या कामाची सुरुवात केली आहे. UNDPच्या माध्यमातून नामिबियातील विविध विकासात्मक उपक्रमांच्या प्रभावी संवाद व प्रसारासाठी ते कम्युनिकेशन सपोर्ट म्हणून योगदान देणार आहेत.
चिपळूणच्या मातीतून पुढे येत अभिषेक यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेली ही संधी उल्लेखनीय मानली जात आहे. त्यांच्या या निवडीमुळे गिजरे कुटुंबीय, पाग परिसर तसेच सचिन खरे व मित्र परिवार, चिपळूणकरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अभिषेक गिजरे यांच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे चिपळूणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.