चिपळूण – समाजाभिमुख पत्रकारितेची परंपरा जपत व्हिजन थ्री न्यूज हे वृत्तमाध्यम दहा वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण करत आहे. या दशकपूर्ती निमित्त समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यासाठी समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, पत्रकारिता, कला, साहित्य, क्रीडा, उद्योग-व्यवसाय, पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण, युवा नेतृत्व, शेती, पर्यटन तसेच सामाजिक परिवर्तनासाठी योगदान देणाऱ्या स्त्री-पुरुष व्यक्तींची नामांकने पाठवण्याचे आवाहन संपादक राजेंद्रकुमार शिंदे यांनी केले आहे. स्वतः किंवा संस्था, सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या माहितीतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची नावे नामांकन स्वरूपात पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. नामांकन प्रस्तावासोबत नाव, गाव, पत्यासहित संबंधित व्यक्तीचा जास्तीत जास्त दोनशे शब्दांत परिचय, कार्याचा तपशील, संपर्क क्रमांक आणि पूर्ण फोटो देणे आवश्यक असून प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन अंतिम परस्कारार्थी निवडण्यात येणार आहेत . निवड झालेल्या पुरस्कारार्थीना व्हिजन थ्री न्यूज च्या दहाव्या वर्धापन दिनी विशेष पुरस्कार सोहळयामध्ये मान्यवरांच्या हस्ते मानाचा फेटा, महावस्त्र, आकर्षक सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देवून गौरवण्यात येणार आहे.
आपले प्रस्ताव व्हिजन थ्री न्यूज, संपादक राजेंद्रकुमार शिंदे, १०५, पहिला मजला, परकार कॉम्प्लेक्स, बाजारपेठ, चिपळूण या पत्त्यावर दिनांक 27 एप्रिल २०२६ पर्यंत पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.