मुंबई : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न ‘कुणबी युवा मुंबई’ सलग्न शिक्षण विभाग यांच्या वतीने रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी परळ येथील कुणबी ज्ञातीगृह (वाघे हॉल) मध्ये ‘भविष्यवेध: करिअर मार्गदर्शन शिबिराचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले. समाजातील विद्यार्थ्यांनी आताच्या डिजिटल आणि स्पर्धेच्या युगात योग्य दिशा निवडून यशाचे शिखर गाठावे, या उद्देशाने आयोजित या शिबिराला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात ठाणे येथील संबोधी करिअर अकॅडमीचे संचालक सन्माननीय मंगेश बोरकर सर यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी केवळ पारंपरिक पदवी शिक्षणावर मर्यादित न राहता UPSC, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षा, आधुनिक क्षेत्रांतील करिअर संधी आणि व्होकेशनल कोर्सेसची सविस्तर माहिती दिली. “मुलांच्या आवडीनुसार करिअर निवडताना पालकांनी त्यांना दडपण न देता पाठबळ द्यावे,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रश्नोत्तरांच्या सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे अत्यंत सोप्या भाषेत निरसन केले.
कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या पंखांना ‘भविष्यवेध’चे बळ! मुंबईत करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न
