लांजा: घर मालकाच्या परवानगीशिवाय घराच्या छपरा वरील कौले, लाकडी रिपा व वासे काढून मोडतोड करत ४ लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी राजपूर तालुक्यातील झर्ये येथील एकावर गुन्हा दाखल केला आहे.
श्रीपाद महादेव कदम (वय ५२, सद्धया रा.१०४ विकास टॉवर, सह्याद्री नगर, मीरा भाईंदर रोड काशिमीरा, मिरा रोड पूर्व, जि.ठाणे) यांनी याबाबतची तक्रार लांजा पोलीस ठाण्यात केली होती. श्रीपाद कदम व साक्षीदार यांचे लांजा तालुक्यातील कुरंग मधलीवाडी येथे सामूहिक मालकीचे घर आहे. सामूहिक मालकीचे आणि छप्पर एक असलेल्या व अंतर्गत विभक्त असलेल्या घराच्या दुरुस्तीचे काम बाळकृष्ण रमेश पांचाळ (रा.झर्ये, ता.राजापूर) यांनी घेतले होते.
याप्रकरणी श्रीपाद कदम यांनी केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी बाळकृष्ण पांचाळ यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२९(४), ३२४(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश आखाडे हे करत आहेत.