चिपळूण : शहरातील अण्णासाहेब खेडेकर संकुलासमोर नगरपालिकेच्या बंद अवस्थेत उभ्या ठेवलेल्या घंटागाडीने एका चारचाकी वाहनाला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात चारचाकीचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.

घटनेनंतर संबंधितांनी नगराध्यक्ष व उपमुख्याधिकारी ठसाळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पाहणीत चालकाने गाडी उभी करताना हँडब्रेक न लावणे किंवा योग्य सुरक्षितता न बाळगणे यामुळेच हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ही गाडी रस्त्याकडे सरकली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. एखादा पादचारी किंवा इतर वाहन याच्या आड आले असते तर गंभीर परिणाम झाले असते. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे.
घटनेनंतर उशिरापर्यंत संबंधित दोन्ही पक्षांमध्ये चर्चाही सुरू होती. मात्र याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.