मंडणगड : ‘यशतेज फाउंडेशन’ व ‘महिला उद्योजिकां’तर्फे १ नोव्हेंबर २०२६ रोजी शहरातील बाजारपेठेत ‘मंडणगड जनता बाजार’ थाटात सुरू करण्यात आला. लघुउद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्थानिक व्यापाराला उभारी देण्यासाठी स्थानिक लघुउद्योजकांच्या छोट्या व्यवसायांचे मोठ्या कंपन्या आणि ब्रँडमध्ये रूपांतर करण्याच्या दूरदृष्टीने आणि ‘आपल्याच माणसाला मोठे करायला हवे’ या उदात्त भावनांसह मंडणगडात ‘मंडणगड जनता बाजार’ या विशेष उपक्रमाची अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पुन्हा एकदा पुनर्रचना व उभारणी करण्यात आली आहे. यशतेज फाउंडेशन आणि महिला उद्योजिका मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रतील मान्यवरांच्या उपस्थितीत बाजाराचा उद्घाटन सोहळा पार पडला असून, या उपक्रमाला स्थानिकांचा अभूतपूर्व आणि भरभरून प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय मंगलमय वातावरणात झाली. या विशेष कार्यक्रमासाठी सौ.प्रतिभा घोसाळकर यांनी आपले सभागृह (हॉल) विनाशुल्क उपलब्ध करून दिले. सौ. दीपिका घोसाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उपक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली, तर सौ.चारुलता पारेख यांनी फीत कापून ( जनता बाजार जनतेसाठी खुला केला. या उद्घाटन सोहळ्याला मंडणगडमधील प्रतिष्ठित व्यापारी, समाजसेवक, विविध क्षेत्रातील नेतेमंडळी, नगरसेविका व नगरसेवक आवर्जून उपस्थित होते. तसेच पोलीस प्रशासन, तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि शिक्षक वर्ग यांनीही उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली व उपक्रमास भरभरून शुभेच्छा दिल्या.
उद्योजकतेचा संदेश आणि पुढील नियोजन:
या जनता बाजारामध्ये एकूण ९ लघुउद्योजकांनी सहभाग घेऊन आपल्या उत्पादनांची विक्री व प्रदर्शनी मांडली आहे. हा उपक्रम पुढील ५ दिवस सलग सुरू राहणार असून, त्यानंतर प्रत्येक शनिवार आणि रविवार मंडणगड बस स्थानकासमोर हा उपक्रम नियमितपणे चालू असणार आहे.
“सिखेगा इंडिया तो आगे बढेगा इंडिया!” हे घोषवाक्य डोळ्यासमोर ठेवून, गावोगावी असणारे बचत गट, तसेच उद्योगशील मुले-मुली यांनी एक पाऊल पुढे टाकावे आणि आपल्या छोट्या उद्योगांना लोकांसमोर आणावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या सर्व उद्योजकांना लागणारे मार्गदर्शन, सहकार्य आणि पाठबळ देण्यासाठी यशतेज फाउंडेशनचे सर्व स्वयंसेवक आणि मेंबर्स पूर्ण ताकदीने कार्यरत आहेत.
जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा दृढनिश्चय:
आज मंडणगडमध्ये सुरू झालेला हा छोटासा अंकुर भविष्यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांसारख्या मोठ्या देशांमध्येही ‘मंडणगड जनता बाजार’च्या माध्यमातून जगभरात पोहोचेल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा हा मंडणगड तालुका जगभरात ओळखला जावा आणि इथल्या सुंदर नैसर्गिक व ऐतिहासिक वारशाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक मंडणगडात यावेत, यासाठी फाउंडेशनची टीम अहोरात्र मेहनत घेत आहे.
नवीन पिढीला व्यापाराची प्रेरणा देणारा हा उपक्रम सध्या मंडणगडमध्ये सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत असून, नागरिकांनी या जनता बाजाराला भेट देऊन स्थानिक उद्योजकांना भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन यशतेज फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
‘यशतेज फाउंडेशन’ व ‘महिला उद्योजिकां’तर्फे ‘मंडणगड जनता बाजार’ सुरू…
