चिपळुण : युनायटेड इंग्लिश स्कूलच्या सन 1980-81 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन शनिवार, दि. 2 मे 2026 रोजी चिपळुण येथील माऊली गार्डनमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

शालेय जीवनातील रम्य आठवणींना उजाळा देण्यासाठी 45 वर्षांनंतर ही बॅच एकत्र येत आहे. सकाळी 9 वाजता पाहुण्यांचे स्वागत व नाश्त्याने कार्यक्रमास सुरुवात होईल.

सकाळी 10 ते 11 या वेळेत ‘परिचय आपला-आपल्यांचा’ या सत्राअंतर्गत प्रत्येक माजी विद्यार्थी आपल्या शालेय जीवनातील मजेशीर आठवण सांगणार आहे. त्यानंतर दुपारी 1:30 पर्यंत फॅमिली क्विझ, पासिंग द पार्सल यांसारखे मनोरंजक खेळ व गाणी, नृत्य, छोट्या नाटिका अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारी 1:30 ते 2:30 या वेळेत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर 3 ते 4:30 दरम्यान मनमोकळ्या गप्पा व ‘ऑन द स्पॉट’ कलाविष्कार सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सायंकाळी 4:30 ते 5 या वेळेत ‘चाय पे चर्चा’ व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने अनेक वर्षांनी भेटणारे वर्गमित्र जुन्या आठवणींमध्ये रममाण होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.