चिपळूण – पुण्यातील घटनांवर महिला व बालविकास विभागाच्या चिपळूण- गुहागर येथील संरक्षण अधिकारी माधवी जाधव यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, नेमकं काय बोलावं आणि काय लिहावं, हेच समजेनासं झालं आहे. मन सुन्न झालं आहे, विचार करणेच शक्य होत नाही आहे . प्रचंड राग, संताप आणि हतबल जास्त प्रमाणात वाटत आहे कारण समाजात घडणाऱ्या या विकृत आणि अमानुष घटना मन हेलावून टाकत आहेत क्रोध आक्रोश करावा की भोगवस्तू म्हणून स्त्री कडे पाहणाऱ्याना लहान लेकरू ही कळू नये या समाजाची वाटचाल पाहताना अत्यंत चीड येत आहे हे प्रकार रोज नव्याने घडत आहेत अगदी गंभीर स्वरूपात .

अत्याचार, हिंसाचार आणि विशेषतः लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना कमी होण्याऐवजी वाढत चालल्या आहेत. फक्त संख्या वाढत नाहीय तर त या घटनांचे स्वरूप अधिक क्रूर, अधिक निर्घृण, विकृत होत चालले आहे. अशा घटनां ऐकणं, पाहणं किंवा त्याचा विचार करणंसुद्धा असह्य होतेय.चार वर्षांच्या एका निष्पाप लेकरावर ६५ वर्षांच्या व्यक्तीकडून झालेला अत्याचार केवळ गुन्हा नाहीय तर संपूर्ण मानवतेला काळिमा फासणारा प्रकार आहे. त्या लहानग्या लेकराला तिच्या स्वतःच्या शरीराचीही पूर्ण जाणीव नाही आणि तिच्यावर असा अमानुष अत्याचार होतोय, ही गोष्टच माणुसकीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. या अशा विकृत मानसिकतेचा उगम नेमका कुठून आहे आणि हे करण्यासाठी ही लोक धजावतात कशी हा प्रश्न अधिकच अस्वस्थ करणारा आहे.
आपल्या देशात कायदे अस्तित्वात आहेत.बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी विविध तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तरीदेखील, या गुन्ह्यांना पूर्णविराम न मिळता त्याचे गंभीर स्वरूप दिसत आहे.यामागे कायद्यातील पळवाटा, न्यायप्रक्रियेतील विलंब आणि अंमलबजावणीतील कमतरता ही कारणे ठळकपणे दिसून येतात. त्यामुळेच अनेक गुन्हेगाराना शिक्षा टळतात किंवा उशिरा शिक्षा मिळते. परिणामी समाजात कायद्याचा धाक थोडा कमीच आहे .
प्रत्येक वेळी एखादी भयंकर घटना घडली की आपण एकवटतो. कॅन्डल मार्च काढले जातात, निदर्शने होतात, आक्रोश व्यक्त केला जातो. पण हा आक्रोश काही दिवसांत ओसरतो आणि पुन्हा सर्व काही पूर्ववत होतं. दरम्यान असंख्य घटना अशा असतात ज्या कधीच प्रकाशात येत नाहीत. त्या पीडितांना आवाज मिळत नाही, न्याय मिळत नाही. हा अदृश्य हिंसाचार अधिक भयानक आहे.
या परिस्थितीत केवळ भावनिक प्रतिक्रिया देऊन चालणारे नाहीय तर ठोस आणि परिणामकारक उपाययोजना करण्याची गरज आहे. कायद्यात आवश्यक ते बदल, जलदगती न्यायालयांची स्थापना, पीडितांना संरक्षण आणि पुनर्वसनाची हमी, तसेच गुन्हेगारांना कठोर आणि निश्चित शिक्षा या सर्व बाबींची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे अत्यावश्यक आहे. शिक्षा केवळ कागदावर कठोर असून चालणार नाही, तर ती प्रत्यक्षातही तितकीच प्रभावी असायला हवी.पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी शिक्षा इतकी ठोस आणि तात्काळ असावी की भविष्यात कोणीही अशा कृत्याचा विचार करण्यासही धजावणार नाही.
याच बरोबर समाजाची मानसिकता बदलणेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्त्रीकडे केवळ भोगवस्तू म्हणून पाहण्याची विकृत प्रवृत्ती अजूनही अस्तित्वात आहे. मात्र, जेव्हा तीन,चार वर्षांच्या निष्पाप मुली या विकृतीची शिकार होतात , तेव्हा हा प्रश्न केवळ स्त्री-पुरुष समानतेपुरता मर्यादित राहत नाहीतो संपूर्ण मानवतेच्या अस्तित्वाशी संबंधित बनतो.
अशा क्रूर कृत्ये करणाऱ्या व्यक्तींना माणूस म्हणावं की नाही बिलकुल नाही ..अशांना जगण्याचे अधिकारच नाहीत खरे तर.
स्त्री म्हणून, एक अधिकारी म्हणून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक माणूस म्हणून या परिस्थितीकडे पाहताना मनात प्रचंड निर्माण होणारी वेदना शब्दांत मांडणं शक्य नाही दैनंदिन काम करताना, अत्याचार, हिंसाचार पाहत असताना अशा विचारपलिकडे घडणाऱ्या घटना ऐकताना ,पाहताना सगळंच संपल्यासारखं वाटत माणुसकी जणू संपली आहे चालली आहे त्याचबरोबरीने हे विकृतीचे वाढत चालले प्रमाण कमी होईल का नाही?
चिमुरडीवर जे काही भीषण घडले ते नेमकं काय हेही त्या जीवाला उमगले नसेल इतकी का वासना तीव्र आहे हा केवळ विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो. तिच्या वेदनेची कल्पनाही असह्य आहे.
आपण नेमके कुठे आहोत? कोणत्या समाजात जगतो आहोत? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आता आली आहे. महिला,मुली , बालके यांच्या प्रति फक्त संवेदनशील राहण्यापेक्षा सहवेदनेची जाणीव होणे जरूर आहे .आपण विसरत चाललो आहोत की समोरची व्यक्ती ही एक जिवंत माणूस आहे ते लेकरू आहे ही आणि जाणीव नष्ट होणे म्हणजे समाज म्हणून प्रत्येकीच अस्तित्वच धोक्यात येतय, तिचा जन्मावर पुन्हा प्रश्नाचं काहूर माजेल हे मात्र नक्कीच. वेदनाच्या पलीकडे जाऊन फक्त निशब्द इतकेच….