दापोली (शैलेंद्र केळकर) : – तालुक्यातील साखरोळी गावात रविवारी ३ मे रोजी मध्यरात्री सुमारे २:०० वाजण्याच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गावातील रहिवासी श्री. जगदीश मोतीराम तलाठी यांच्या घर व दुकानाला अचानक भीषण आग लागली. आगीचे स्वरूप इतके तीव्र होते की काही वेळातच संपूर्ण घर आणि दुकान जळून खाक झाले.
या घटनेत घरामध्ये असलेले दोन भरलेले व दोन रिकामे असे एकूण चार गॅस सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले, त्यामुळे संभाव्य मोठा स्फोट टळला. घटनास्थळी दापोली पोलीस ठाणे येथील पोलीस प्रकाश मोरे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. सुमारे सकाळी १०:१५ वाजेपर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात आली. या आगीत घरातील किराणा दुकान पूर्णतः नष्ट झाले असले तरी शेजारील पिठाची चक्की वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
