चिपळूण : पारंपरिक मराठी युद्धकलेचा जागतिक स्तरावर गजर करणाऱ्या लाठी-काठी विश्वविक्रम उपक्रमात चिपळूणची कन्या गार्गी पराग पुरोहित हिने उल्लेखनीय सहभाग नोंदवत आपल्या कर्तृत्वाची ठळक छाप उमटवली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण चिपळूण शहराची मान अभिमानाने उंचावली असून सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य विश्वविक्रम उपक्रमात देशभरातील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या विश्वविक्रमसाठी लाठी राष्ट्रीय पंच श्री. सुरेंद्र शिंदे व सौ. कविता शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. शिस्त, एकाग्रता आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर गार्गीने सादर केलेल्या लाठी-काठीच्या सामूहिक प्रात्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकली. या उल्लेखनीय कामगिरीची नोंद Golden Book of World Records मध्ये करण्यात आली असून, हा क्षण सर्व सहभागींसाठी अभिमानाचा ठरला.
या यशामागे गार्गीची जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सराव यांचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट होते. गार्गीचे वडील श्री. पराग पुरोहित हे चिपळूणमधील ‘रॉयल मेडिकल’चे संचालक असून, आई सौ. नीलम पुरोहित या प्राथमिक शिक्षिका आहेत. तसेच आई-वडिलांबरोबरच आजी आजोबा श्री. व सौ सविता सुरेश पुरोहित व श्री व सौ. सुप्रिया विश्वनाथ भिडे यांच्या मार्गदर्शन व संस्कारांमुळेच गार्गीने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केल्याची भावना व्यक्त होत आहे.
लाठी-काठी ही केवळ क्रीडा कला नसून, ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यपरंपरेशी जोडलेला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. या कलेच्या माध्यमातून तरुण पिढीत शौर्य, आत्मविश्वास, शिस्त आणि संस्कृतीची जाणीव दृढ होत आहे. गार्गीच्या या यशस्वी कामगिरीमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून, तिचे उदाहरण भविष्यातील पिढीसाठी निश्चितच आदर्श ठरणार आहे.
गार्गी पराग पुरोहित हिच्या या अभिमानास्पद यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, चिपळूणकरांसाठी हा क्षण खऱ्या अर्थाने गौरवाचा आणि अभिमानाचा ठरला आहे.