चिपळूण – वाढते तापमान,बेसुमार जंगलतोड आणि जैवविविधताची होत असलेली हानी रोखण्यासाठी, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याची ‘पक्षी अभयारण्य ‘ पर्यटनासाठीची नवी ओळख पुढे येण्यासाठी शासकीय अर्थात वन खात्याच्या जमिनी क्षमतेत वाढ होण्याची गरज असल्याची मागणी काही संस्थांनी शासनाकडे केली आहे. यामध्ये हेल्प फाउंडेशन चिपळूण या संस्थेने शासनाकडे या संदर्भात भविष्यातील या महत्त्वांच्या विषयाकडे एका निवेदनाव्दारे लक्ष वेधले आहे.
पक्षी अभयारण्य या जिल्ह्याची एक नवी आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ओळख ठरणार आहे त्याचबरोबर येथील जैविक साखळी अधिक बळकट करणे आणि जमिनीची धूप थांबवणे पक्षांसह वन्यजीवांसाठी पानवठे तयार करणे व त्याचबरोबर दुर्मिळ औषधी वनस्पती आणि झाडांची जपवणूक करणे अशा अनेक योजना या वाढीव जंगल क्षेत्रातून अंमलात येऊ शकतात. जशी महाराष्ट्रात व्याघ्र अभयारण्य म्हणून नागपूरची ओळख आहे, त्याचप्रमाणे पक्षी अभयारण्य रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आणि जिल्ह्याचे वाढीव तापमान नियंत्रित करण्याकरता डोंगराळ भागातील ज्या पडीक जमिनी आहेत त्या जमिनी संबंधित जमीन मालक अथवा शेतकरी यांनी वन खात्याकडे दिल्या तर आरक्षित क्षेत्र म्हणून विकसित करून भविष्यामध्ये या सर्व निसर्गाच्या समतोल राखण्याच्या योजना राबवण्यात अधिक चालना मिळेल असाही विश्वास संस्था चालकांनी व्यक्त केला या संदर्भात वनमंत्री तसेच वनसचिव यांना निवेदन पाठवण्यात आलेले आहे.