खेड (प्रतिनिधी) : – शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच स्थानिक व्यापाऱ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खेड नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकास प्रकल्पांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.
शहरातील महाडनाका येथे खेड नगरपरिषदेमार्फत सुमारे ₹१ कोटी ६१ लाख ३८ हजार ८०४ निधीतून उभारण्यात आलेल्या भव्य व्यापारी संकुलाचे भूमिपूजन राज्याचे गृहराज्यमंत्री ना. श्री. योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याचबरोबर भाऊसाहेब पाटणे व्यापारी संकुलाच्या विस्तारित बांधकामाचे लोकार्पणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नवीन व्यापारी संकुलांमुळे स्थानिक व्यापाऱ्यांना आधुनिक व सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध होणार असून शहराच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. तसेच रोजगारनिर्मितीला देखील या प्रकल्पांचा मोठा फायदा होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
