लोटे : – मुंबई गोवा महामार्गावरील लोटे माळ येथील एका पेट्रोल पंपात डिझेलचा काळाबाजार होत असताना रांगेतील ग्राहकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. ही घटना काल शनिवार दिनांक १६ रोजी अकराच्या सुमारास घडली.
आखातातील युद्धामुळे होर्मुझ च्या सामुद्रधूनीतून होणारी पेट्रोलजन्य पदार्थांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी संपूर्ण जगाला इंधन टंचाईला सामोरे जावे लागत आहे. भारतातही हा प्रश्न गंभीर बनला आहे. याचा थेट परिणाम कोकणातील पर्यटन, व्यवसाय, उद्योग, लग्नसराई आणि वैयक्तिक मानवी जीवन यावर झाला आहे. आधीच शाळा महाविद्यालयांना मे महिन्याची सुट्टी त्यातच लग्नसराई आणि कोकणातील पर्यटनाचा हंगाम. यामुळे मुंबई गोवा महामार्गावर दररोज हजारो वाहने प्रवास करत असतात. याशिवाय येथील स्थानिक व्यावसायिक, कामगार वर्ग यांनाही या ना त्या कारणाने आपल्या वाहनांनी प्रवास करावा लागतो. मात्र पेट्रोलियम पदार्थांच्या कंपन्यांकडून होणाऱ्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे महामार्गावरील पेट्रोल पंप ठप्प झाले आहेत.
अशातच काही पेट्रोल पंपांना इंधन मिळालेच तर ते आणीबाणीच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच प्रकार महामार्गावरील लोटेमाळ येथे असणाऱ्या एका पेट्रोल पंपात घडला. खेड तालुक्यातील असगणी गावचे ग्रामस्थ हुसेन घारे हे आपल्या ताब्यातील टाटा नेक्सॉन गाडी घेऊन या पंपावर आले असता पेट्रोल, सीएनजी आणि डिझेल या तिन्ही प्रकारांना वेगवेगळ्या रांगा होत्या. यावेळी रांगेतील वाहनांना डिझेल देण्याऐवजी एका कारखान्यातून आलेल्या पिक अप टेम्पो ( एम.एच. ०८ / डब्ल्यू ०८७८ ) मध्ये ठेवलेल्या ड्रम मध्ये २००० लिटर डिझेल देण्याचा कार्यक्रम चालू होता. यातील सहा ड्रम डिझेल ने भरून झाले होते. आणखी एका ट्रॅक्टर मध्ये ( एम.एच. ११ / बी. ए .०९३५ ) ड्रम ठेवले होते त्यामध्ये सोळाशे लिटर डिझेल भरले जाणार होते.
मात्र रांगेत असलेल्या हुसेन घारे यांनी या प्रकारावर आक्षेप घेतला. डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा असताना तुम्ही एखाद्या कारखान्याला दोन हजार लिटर दिल्यानंतर रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांनी काय करायचे ? असा संतप्त सवाल हुसेन घारे यांच्यासह रांगेतील अन्य वाहन चालकांनीही विचारला आणि ड्रम मध्ये डिझेल भरणे थांबविले. दोन दोन तास रांगेत उभे राहून तुम्ही एकाच किंवा दोन गाड्यांना दोन दोन हजार लिटर डिझेल देणार असाल तर आमचा या उन्हातून दोन दोन तास रांगेत उभे राहून काय उपयोग? असा सवाल या संतप्त वाहन धारकांनी केला. देशात इंधनाचा तुटवडा असताना पेट्रोल पंप मालकांकडून असा काळाबाजार होत असेल, तर याची पुरवठा विभागाने किंवा तत्सम यंत्रणांनी सखोल चौकशी करून यांचेवर कारवाई करावी अशी मागणी वाहन धारकांकडून होत आहे.
