मुंबई : महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून, येत्या १८ जून रोजी या जागांसाठी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भातील संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केले असून या सर्व जागा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आहेत.
निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेनुसार २५ मे ते १ जून २०२६ या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येतील. त्यानंतर २ जून रोजी अर्जांची छाननी केली जाईल आणि ४ जूनपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्याची मुतद असेल. जर निवडणूक बिनविरोध झाली नाही, तर १८ जून रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडेल आणि २२ जून रोजी या जागांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. २५ जूनपूर्वी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे या जागा रिक्त होत्या. मात्र, आता राज्य निवडणूक आयोगाच्या अहवालानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद आणि परभणी-औंगाबाद या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील १६ जागांसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.