चिपळूण – कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. इथली जागा ही पारंपरिक शिवसेनेची आहे त्यामुळे या जागेवर शिवसेनेचा हक्क आहे. हे लक्षात घेऊन इथली उमेदवारी माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या रूपाने चिपळूण तालुक्याला मिळावी अशी मागणी चिपळूण तालुक्यातील शिवसैनिकांनी केली आहे. आज झालेल्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत तसा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून १ जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.राज्यात महायुती सत्तेत असल्याने रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्हयाच्या मतदारसंघाची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे.या मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी शिवसेना प्रथम क्रमांकावर आहे त्यामुळे साहजिकच या जागेवर शिवसेनेचा दावा निश्चित मानला जात आहे. शिवसेनेकडून चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधीत्व केलेल्या सदानंद चव्हाण यांना संधी मिळावी अशी येथील कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे.ना.एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी चिपळूण येथील जाहीर सभेत लवकरच सदानंद चव्हाण यांना मोठी जबाबदारी दिली जाईल असा शब्द दिला होता.